Wednesday, January 7, 2026

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि शहराच्या कारभारावर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी ठाणे शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. जांभळी नाका येथून सुरू झालेल्या या रॅलीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जनतेने महायुतीवर दाखवलेला विश्वास आता महापालिका निवडणुकीतही कायम राहील, असे ते म्हणाले.

राज्यातील विरोधकांकडे ठोस मुद्दे नसून निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या आघाड्या जनतेला स्वीकारार्ह नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्याचा कोणताही राजकीय परिणाम होणार नसल्याचे सांगत, ठाणेकरांनी विकास, स्थैर्य आणि विश्वासाला प्राधान्य देत महायुतीलाच कौल दिला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुती सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग दिसून आला. महिलांचा हा उत्साह सरकारच्या विविध योजनांवरचा विश्वास दर्शवतो, असे शिंदे यांनी सांगितले.

या प्रचार रॅलीत खासदार नरेश म्हस्के, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली राबोडी शंकर रोड, चेंदणी कोळीवाडा, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव परिसर, लोकमान्य नगर, भीमनगर, मानपाडा आणि मनोरमा नगर या भागांतून मार्गस्थ झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत रॅली निघाल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment