कर्तृत्ववान ती राज्ञी : चित्रा कुलकर्णी
मराठी साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे निष्ठेने, सातत्याने आणि सामाजिक जाणीवेतून कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. पद्मा हुशिंग. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, नाटककार, मार्गदर्शक प्राध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशा विविध भूमिका समर्थपणे निभावत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शब्दांवरची पकड, विषयांतील संवेदनशीलता आणि स्त्रीजीवनाकडे पाहण्याची समतोल दृष्टी ही त्यांच्या जगण्याची आणि साहित्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग, हा साहित्यक प्रवास कसा घडला आज आपण जाणून घेऊया.
मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चित्रा कुलकर्णी यांचे आयुष्य म्हणजे संघर्षातून फुललेले एक स्वयंभू कमळ आहे. ताईंना शिक्षणाची प्रचंड ओढ होती; परंतु खेड्यात सोयी नसल्यामुळे चौथीपासून नववीपर्यंत त्यांना नातेवाइकांकडे राहून शिकावे लागले. आईबाबांपासून दूर राहिल्याने बालवयातच समजुदारपणा आपोआप आला. दहावीत उत्तम गुण मिळवूनही शिक्षणाची सोय नसल्याने आणि परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कॉलेजला जाता आले नाही, मात्र तिथेच त्यांच्या वाचनाचा छंद जोपासला गेला. आईला घरकामात मदत करता करता भरपूर वाचन करता आले.शिक्षणाची ओढ असल्याने बाहेरूनच बारावीची परीक्षा दिली. कॉलेजला जाऊन शिकण्याचे स्वप्न अपुरेच राहिले.
जेमतेम १८ वर्षे पूर्ण होताच योगायोगाने त्यांचा विवाह मुंबई उच्च न्यायालयात वकील असलेल्या अॅड. प्रवीण हुशिंग यांच्याशी झाला आणि एका लहान खेड्यातील चित्रा कुलकर्णी सौ. पद्मा हुशिंग होऊन मुंबई महानगरात आली.
मराठवाड्यातील मिश्र भाषा आणि सासरच्या पुण्याच्या शुद्ध भाषेचा सुरुवातीला त्यांना न्यूनगंड वाटायचा; परंतु त्यांच्या पतीने दिलेला विश्वास हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ठरला. तीन मुले आणि स्वतःच्या भावंडांना शिकवण्याची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांच्यातील जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. ठाण्यातील 'एम. एच. हायस्कूल'मधील SNDT च्या रात्रशाळेतून त्यांनी पदवीचे शिक्षण प्रथम वर्गात पूर्ण केले. याच जिद्दीने बीएड् केले, एमए, एम्एड् केले. सर्व पदव्या प्रथम श्रेणीत असल्याने पतीच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे त्यांचे स्वप्नं वयाच्या पस्तिसाव्या वर्षी पूर्ण झाले. मंगला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी तब्बल २७ वर्षे मार्गदर्शक प्राध्यापिका म्हणून सेवा दिली.
"परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण अडू नये," हा अनुभव असल्याने हाच विचार उराशी बाळगून पद्मा ताईंनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. दरवर्षी पाच विद्यार्थ्यांच्या शालेय गरजा त्यांनी तब्बल १५ वर्षे पूर्ण केल्या. शिक्षण अर्धवट सोडलेल्या कित्येक मुलींना स्वखर्चाने मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला त्यामुळे अनेक मुलींना पदवी शिक्षण घेता आले... एवढेच नव्हे, तर आपल्याकडे काम करणाऱ्या दोन मुलींचे कन्यादानही त्यांनी केले. सोसायटीतील कामवाल्या महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे बँक खाते उघडून देणे अशा उपक्रमांतून त्यांनी सामाजिक कृतज्ञता जपली. दहावी-बारावीच्या गरीब मुलांना मोफत मार्गदर्शन करणे चालूच आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी कथा, कविता, ललितलेख, नाट्यसंहिता आणि सदर लेखन अशा विविध प्रकारांतून मुशाफिरी केली. ‘सृजा’ हा कवितासंग्रह, ‘नाळ’ हा कथासंग्रह, ‘अशी मी अशी मी’ आणि ‘झाले मोकळे आकाश’ या नाट्यसंहिता त्यांनी लिहिल्या. ज्यांचे महाराष्ट्रभर अनेक प्रयोग झाले – ही त्यांची सर्जनशीलता अधोरेखित करणारी महत्त्वाची साहित्यनिर्मिती आहे. लॉकडाऊन काळातील ‘लॉकडाऊन षट्कार’ हा ललितलेख संग्रह, किशोरवयीन मुलांसाठी ‘महाराष्ट्रातील संतरत्ने’ ही कथामाला, तसेच ‘स्त्रीवादी मराठी साहित्य’ या विषयावरील राज्यस्तरीय निबंध त्यांच्या लेखणीची सामाजिक जाण दर्शवतात.विशेषतः ‘साहित्यातील स्त्रीचे सामाजिक स्थान’ या विषयावर सलग वर्षभर केलेले सदर लेखन स्त्री-अनुभवांचे सूक्ष्म, वास्तववादी आणि प्रगल्भ दर्शन घडवते. स्त्रीवादी विचार मांडताना त्यांची भूमिका आक्रमक न होता संवादात्मक आहे, ही बाब त्यांच्या लेखनाला अधिक प्रभावी बनवते.
‘आम्ही सिद्ध लेखिका' या अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षांत तीन हजार लेखिकांची संघटना उभी केली. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, गोवा, येथे संस्थेच्या शाखा कार्यरत असून, लंडन अमेरिका येथूनही लेखिका संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी लेखिका यांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांचे चालू आहे. आम्ही सिद्ध लेखिका' संस्थेच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे म्हणूनच महाराष्ट्रातील विविध भागात पाच वर्षात सलग चार राज्यस्तरीय संमेलनं विविध मान्यवरांचे उपस्थितीत यशस्वी केले. या साठी त्यांना सर्व ज्यैष्ठांचे, पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभतात या बद्धल त्या कृतज्ञता व्यक्त करतात..
महिलांनी टीव्ही मालिकांमध्ये वेळ न घालवता समृद्ध अनुभवातून साहित्यनिर्मिती करावी, एका ठरावीक वयानंतर महिलांनी संसारिक गोष्टींकडे अलिप्त दृष्टिकोन ठेवून स्वतःतील कलागुणांना वाव द्यावा व स्वतःकडील उपलब्ध क्षमतानुसार सामाजिकतेची जाणीव वृद्धंगित करणे हा त्यांचा ध्यास आहे. "बस झाले बाई, बाहेर पड आता" आणि स्वतःसाठी एक दिवस तरी जगून बघ अशी तळमळ त्या व्यक्त करतात. महिलांनी स्वतंत्र असावे; परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा ओळखून वागावे असा संदेश त्या देतात. आपल्या जगण्यात संसार, संस्कृती आणि संस्काराचा तसेच परंपरांचा विसर पडू देऊ नये असेही त्या तळमळीने सा़गतात.
आदर्श शिक्षक पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार आणि राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या पद्मा ताई आजही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. स्वतःचे कार्यक्षेत्र सांभाळताना पद्माताईंनी संसारिक मूल्य देखील उत्कृष्टरीत्या रुजवली आहेत.त्यांची तीनही मुले नैतिक मूल्यांची जाणीव ठेवून , सामाजिक भान जपत त्यांचे संसारिक आयुष्य सुसंस्कृतपणे जगत आहेत. भविष्यकालीन योजनांमध्ये वेद ,वाङ्मय, ऋषी यांचा अभ्यास करून त्यांची ओळख स्वतःच्या लेखनातून करून देण्याचा मानस पद्माताई व्यक्त करतात. अभिनव नाट्यछटा', 'निर्मोही' 'जाईजुई' हे साहित्य प्रकाशनाच्या तयारीत आहेत.मुळातच आस्वादक असलेल्या पद्माताईंना शास्त्रीय संगीत ऐकण्याची देखील खूप आवड आहे .
संघर्षातून यशाचे शिखर गाठणाऱ्या पद्माताईंचा हा प्रवास केवळ एका महिलेचा नसून, तो जिद्दीच्या आणि संस्कारांच्या विजयाचा प्रवास आहे. ज्याप्रमाणे यज्ञातील समिधा स्वतः जळून प्रकाशाला जन्म देतात, त्याचप्रमाणे पद्मा ताईंनी स्वतः कष्ट सोसून अनेकांच्या आयुष्यात साहित्यरुपी ज्ञानाचा दिवा लावला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या समर्पित योगदानाच्या या वाटचालीत अधिक हात जोडले जाऊन साहित्यिक कर्मयोगिनीच्या या पवित्र कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस असाच बहरत राहो. त्या वटवृक्षाच्या सावलीत पुढच्या अनेक पिढ्या साहित्याने, संस्कृतीने समृद्ध होवोत या सदिच्छेसह भरभरून शुभेच्छा !






