मुंबई : मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस ही रेल्वे टर्मिनस कार्यरत आहेत. यात २०२६ च्या अखेरीस जोगेश्वरी टर्मिनसची भर पडणार आहे. जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. प्रवाशांना तेथून प्रवास सुरू करता येईल. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी पश्चिम रेल्वेने हे टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या टर्मिनसवर दररोज बारा जाणाऱ्या आणि तेवढ्याच येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतील. यात प्रामुख्याने दिल्ली आणि उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील.
अमृत भारत स्टेशन विकास योजनेचा भाग म्हणून जोगेश्वरी टर्मिनसचा विकास केला जाईल. नवीन टर्मिनसमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेची संख्या वाढण्यास मदत होईल. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जमिनीवर हे नवीन रेल्वे टर्मिनस बांधले जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी जोगेश्वरी टर्मिनस सोयीचे ठरेल. नव्या टर्मिनसच्या कव्हर शेडचे बांधकाम, सेवा इमारत, प्लॅटफॉर्मचे काम आणि स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यानंतर ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होईल. हा ७६.८७ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५१ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यात दोन प्लॅटफॉर्म आणि तीन लाईन बांधण्याचा समावेश होता. प्रकल्पातील विलंब आणि इतर कारणांमुळे आता बजेट ७६ कोटींवर पोहोचले आहे.
जोगेश्वरी टर्मिनसवर २४ डब्यांच्या गाड्या सहज थांबू शकतील. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन आयलंड प्लॅटफॉर्म (दोन्ही बाजूंनी रेल्वे ट्रॅकसह), पिट लाइन आणि शंटिंग नेक बांधले जाईल.






