Wednesday, January 7, 2026

अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या; एक्स प्रियकराला तामिळनाडूमधून अटक

अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या; एक्स प्रियकराला तामिळनाडूमधून अटक

लास वेगास : अमेरिकेत बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय भारतीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेरीलँड राज्यातील एलिकॉट सिटी येथे राहणारी निकिता गोडिशाला हिचा मृतदेह तिच्या एक्स प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये चाकूने वार केलेल्या अवस्थेत सापडला आहे. या प्रकरणात निकिताचा माजी प्रियकर अर्जुन शर्मा हाच मुख्य संशयित आरोपी असून, हत्येनंतर तो भारतात पळून गेल्याचा आरोप आहे. दरम्यान, इंटरपोलच्या मदतीने अर्जुन शर्माला तामिळनाडूमधून अटक करण्यात आली आहे.

निकिता गोडिशाला २ जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरीलँडमधील कोलंबिया येथील २६ वर्षीय अर्जुन शर्मा याच्या अपार्टमेंटमध्ये झडती घेतली असता निकिताचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले.

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अर्जुन शर्मानेच पोलिसांकडे निकिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याने ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता अपार्टमेंटमध्ये शेवटचं निकिताला पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिस तपासात समोर आलं की, २ जानेवारी रोजी म्हणजेच तक्रार दाखल केल्याच्याच दिवशी अर्जुन शर्मा भारतात जाणाऱ्या विमानाने अमेरिकेतून फरार झाला होता.

तक्रार दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अपार्टमेंटची झडती घेतली असता निकिता गोडिशाला मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळनंतर निकिताची हत्या करण्यात आली असावी.

या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन शर्मा गुन्हे दाखल करत अटक वॉरंट जारी केलं आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अमेरिकेतील संघीय तपास यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरपोलच्या मदतीने कारवाई सुरू करण्यात आली असून, शर्माला तामिळनाडूतून अटक करण्यात आली.

दरम्यान, वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरून निवेदन जारी करत निकिताच्या कुटुंबाशी संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. तसेच, स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सर्वतोपरी मदत केली जात असल्याचंही दूतावासाने स्पष्ट केलं आहे. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी सांगितलं की, या हत्येचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीला अमेरिकेत प्रत्यार्पित करण्याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Comments
Add Comment