Wednesday, January 7, 2026

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन ; वयाच्या ८२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन ; वयाच्या ८२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१ मे १९४४ रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी राजकारणात येण्यापूर्वी भारतीय हवाई दलात सहा वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून सेवा बजावली होती. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी अनेक वर्षे खासदार म्हणून काम केलं. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वे राज्यमंत्री असतानाच रेल्वे बजेट सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते.

पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा होता. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली.

१९९६ ते २०११ या कालावधीत त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. या काळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजक समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. मात्र या स्पर्धांदरम्यान खर्च, कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. २५ एप्रिल २०११ रोजी सीबीआयने भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती. यानंतर मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला.

तपासात ठोस पुरावे न सापडल्यामुळे २०२५ मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला, जो न्यायालयाने स्वीकारला. या निर्णयानंतर त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेला दिलेली त्यांची भेटही राजकीय चर्चेचा विषय ठरली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा