मुंबई : मुंबईतील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विविध पक्षांच्यावतीने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या वाढलेली पहायला मिळाली असली तरी मुंबईतील असे नऊ प्रभाग आहेत जिथे केवळ दोनच उमेदवार आमनेसामने उभे आहेत. त्या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. बऱ्याच वेळेला मतांची टक्केवारी कमी करण्यासाठी अपक्षांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची रणनिती आखली जाते; परंतु मुंबईतील असे ९ प्रभाग आहेत जिथे थेट लढत होणार असून नक्की तेथील मतदारांचे मत कुणाच्या पारड्यात पडते आणि त्या भागात कुणाचा पक्ष अधिक मजबूत आहे याची आकडेवारीत मतदानातून समोर येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह बंडखोर अपक्ष तसेच इतर अपक्ष अशाप्रकारे १७०० उमेदवार नशीब आजमवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी सरासरी पाच ते सहा उमेदवार हे निवडणूक रिंगणात, तर काही ठिकाणी दहा पेक्षाही अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचेही दिसून येत आहे; परंतु २२७ प्रभागांपैंकी ९ प्रभागांमध्ये केवळ दोनच उमेदवार असल्याने त्या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे.
यामध्ये दहिसर विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६, मागाठाणे विधानसभेतील प्रभाग क्रमांक ११, बोरीवली विधानसभेतील प्रभाग क्रमांक १५ व १८, चारकोप विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९, मालाड पश्चिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक ४६, माहिम दादर विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९१, वरळी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९८ आणि कुलाबा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २२६ आदींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा अशा पारंपरिक राजकीय शत्रु असलेल्या पक्षांमध्ये तीन जागांवर, तर शिवसेना आणि मनसे यांच्या दोन जागांवर, भाजप आणि मनसेमध्ये एका जागेवर तर भाजप विरुद्ध अपक्ष यांच्या एक जागेवर लढत होणार आहे. भाजप विरुद्ध उबाठा यांच्यामध्ये दोन जागांवर थेट लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक ६
दिशा कारकर (शिवसेना) विरुध संजना वेंगुर्लेकर (उबाठा)
प्रभाग क्रमांक ११
डॉ अदिती भा.खुरसुंगे (शिवसेना) विरुध कविता माने (मनसे)
प्रभाग क्रमांक १५
जिग्ना शाह (भाजप) विरुध जयश्री एडवीन प्रविणकुमार कोटा(उबाठा)
प्रभाग क्रमांक १८
संध्या विपुल दोषी सक्रे (शिवसेना) विरुध सदिच्छा मोरे (मनसे)
प्रभाग क्रमांक १९
दक्षता कवठणकर (भाजपा) विरुध लिना गुढेकर (उबाठा)
प्रभाग क्रमांक ४६
योगिता कोळी (भाजपा) विरुध स्नेहिला डेहलीकर(मनसे)
प्रभाग क्रमांक १९१
प्रिया सदा सरवणकर (शिवसेना) विरुध विशाखा राऊत(उबाठा)
प्रभाग क्रमांक १९८
वंदना गवळी (शिवसेना) विरुध अबोली खाड्ये(उबाठा)
प्रभाग क्रमांक २२६
मकरंद नार्वेकर (भाजपा) विरुध तेजल दिपक पवार(अपक्ष)






