Wednesday, January 7, 2026

मुलीचे नाव घेऊन बोलावले आणि काटा काढला

मुलीचे नाव घेऊन बोलावले आणि काटा काढला

पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाचे नाव अमरसिंह गचांड असून, तपासात समोर आले आहे की आरोपींनी इंस्टाग्रामवर एका मुलीच्या माध्यमातून त्याला जाळ्यात ओढले. चार महिन्यांपूर्वी अमरसिंहला एका व्यक्तीने ठार केल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे; त्यानंतर आरोपींशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. प्राथमिक माहिती नुसार, या वादातून त्याचा बदला घेण्याचा कट रचण्यात आला. २९ डिसेंबर रोजी सकाळी अमरसिंह घरातून बाहेर पडला. आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज परिसरात बोलावले आणि तिथून खेडशिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने त्याची निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पाणी अडवण्यासाठी तयार केलेल्या चारीत दफन करण्यात आला.

मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्याचा मोबाईल बंद होता आणि दुचाकीदेखील सापडली नाही. २४ तासांनंतर कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात त्याचे शेवटचे ठिकाण लोणावळा परिसरात असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी संशयितांची नावे आणि मोबाईल क्रमांक पोलिसांना दिले; मात्र संशयितांचे फोन बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाचा गंभीर आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment