मुंबई : मुंबईच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपचा गमछा गळ्यात घालताच धुरी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंवर टीकेची तोफ डागत खळबळजनक दावे केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना संतोष धुरी यांनी राज ठाकरेंच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "राज ठाकरे साहेबांनी आता अशा लोकांशी युती केली आहे ज्यांच्या अंगात 'हिरवं रक्त' आहे. दुर्दैवाने या लोकांनी आता मनसेचा पूर्ण ताबा घेतला असून राज साहेबांनी आपला स्वाभिमानी पक्ष त्यांच्यासमोर पूर्णपणे 'सरेंडर' केला आहे." मनसेच्या मूळ विचारधारेला हरताळ फासल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जागावाटपावर भाष्य करताना धुरी यांनी मनसेला मिळालेल्या जागा ही एक 'फेक' असल्याचं म्हटलं.
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या हैदोसामुळे संपूर्ण चाकण शहरात भीतीचं ...
"मुंबईत ५२ जागा मनसेला सोडल्याचं दिसतंय, पण प्रत्यक्षात त्यातील ७-८ जागा निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने जाणीवपूर्वक अशा जागा मनसेला दिल्या जिथे त्यांचे उमेदवार नव्हते किंवा जिथल्या विद्यमान नगरसेवकांचे नाव खराब झाले होते. ही केवळ मनसेची फसवणूक आहे," असा दावा धुरी यांनी केला. मराठी माणसाचे गड मानल्या जाणाऱ्या माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूप या भागांतील जागावाटपावर धुरी यांनी संताप व्यक्त केला. "जिथे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, तिथे मनसेची केवळ एका जागेवर बोळवण करण्यात आली आहे. ठाकरे गटाने स्वतःला हव्या होत्या त्याच जागा मनसेला दिल्या आणि मनसेच्या नेतृत्वाने त्या मुकाटपणे स्वीकारल्या," असे म्हणत त्यांनी मनसेच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"वांद्रे बंगल्यावरून आला आदेश"
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमध्ये राज ठाकरेंनी आपल्याच निष्ठावान शिलेदारांना राजकीय चक्रव्यूहात अडकवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. "राज साहेबांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर केले आहेत," असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. धुरी यांनी जागावाटपातील अंतर्गत घडामोडींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा मिळण्याचे ठरले होते. मात्र, दादरमधील वॉर्ड क्रमांक १९० आणि १९२ मनसेला मिळणार नाहीत, असे नितीन सरदेसाई यांनी मला स्पष्ट सांगितले. तेव्हाच मला जाणीव झाली की आपल्याला बाजूला सारले जात आहे. विशेष म्हणजे, वॉर्ड १९२ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आणि प्रकाश पाटणकर यांच्याकडूनही तो काढून घेण्यात आला."
जागावाटपाच्या चर्चेत मनसेचे प्रमुख चेहरे असणाऱ्या संदीप देशपांडे यांना डावलल्याबद्दल धुरी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी दावा केला की, "संदीप देशपांडे यांना चर्चेत का घेतले नाही, याची जेव्हा आम्ही माहिती काढली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. वांद्रे येथील बंगल्यावरून (मातोश्री) असा तह झाला होता की, संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपाच्या प्रक्रियेत कुठेही दिसणार नाहीत. राज साहेबांनी हा आदेश मान्य करत आम्हाला सरेंडर केले." मला उमेदवारी मिळाली नाही किंवा चर्चेत घेतले नाही याचा राग नाही, असे स्पष्ट करताना धुरी यांनी पक्षाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, "राज साहेबांनी आम्हाला यापूर्वी खूप दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता आहेच. मात्र, पक्षासाठी लढणाऱ्या नेत्यांना अशा प्रकारे राजकीय बळी देणे हे दुर्दैवी आहे. नेत्यांना अंधारात ठेवून वरच्या पातळीवर जे तह झाले, त्यामुळेच पक्ष आज या स्थितीत पोहोचला आहे." धुरी यांच्या या आरोपांमुळे मनसे आणि ठाकरे गटातील गुप्त तहाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, संदीप देशपांडे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






