ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने निर्धारनामा प्रकाशित केला. 'विकासाला गती, पर्याय एकच; भाजप - महायुती' असे सांगत निर्धारनामा प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी भाजप शिवसेना युती 'अब की बार सो पार' जाणार महापालिकेतील किमान १०० जागा नक्की जिंकणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केला. निर्धारनामा प्रकाशनप्रसंगी माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ता सागर भदे उपस्थित होते. प्रकाशन सोहळा ठाणे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झाला.
भाजप - शिवसेना महायुतीविषयी जनतेच्या मनात विश्वास आहे. या विश्वासामुळेच महायुती किमान १०० जागा नक्की जिंकणार असा विश्वास भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. तर निर्धारनामा म्हणजे एक प्रकारे ठाण्याच्या सर्वांगीण विकासाची रुपरेखा असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले. ठाणे शिक्षण आणि रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी नियोजन करणार असल्याचेही आमदार संजय केळकर म्हणाले.
भाजप- शिवसेना महायुतीने ठाणे शहरासाठी ५४ कलमी 'निर्धारनामा' जाहीर केला आहे. ज्यात शहरात मिनी क्लस्टर योजना राबविण्यासह ठाणेकरांसाठी २४ तास पाणी पुरवठा, नवीन गृहसंकुलांसाठी पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण जाहीर केले आहे. तसेच, दर तीन महिन्यांनी प्रभागसभा घेऊन प्रभागनिहाय खर्चाचा डिजिटल बोर्ड लावला जाईल. स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक ठाणे साकारण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातुन तलावांचे सुशोभीकरण व पर्यटन सुविधा विकसित केल्या जातील. कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्या बरोबरच शहरात भूमीगत कचरा कुंड्या बसवण्यात येतील.त्याचप्रमाणे दुबार नालेसफाईसह मलनि:स्सारण ऑडिट व कृती आराखडा केला जाईल. शहरासाठी कॅन्सर हॉस्पिटल, एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय, महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व्हॅन्स, ठाणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने सहा ते आठ भव्य पार्कस, नाट्यगृहे, फिल्म फेस्टिव्हल, स्ट्रीट आर्ट, संगीत महोत्सव, डिजिटल ग्रंथालये आदीसह नवीन स्टेडियम उभारून आयपीएल व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जाईल. कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख डिजिटल शिक्षणाबरोबरच महापालिका शाळांमध्ये अर्ध-इंग्रजी पद्धती, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासह टीएमटी सेवेचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार असुन प्रत्येक मेट्रो स्टेशनपासून परिसरात जाण्यासाठी मिनी बसचे नेटवर्क उपलब्ध केले जाईल. आधुनिक पार्किंग स्टेशन आणि ठाणे शहरात इंटर्नल रिंग मेट्रो बनविण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे. ठाणेकरांना उत्तम पायाभूत सुविधा देण्याकरीता शहरातील १९७ कि.मी. रस्त्यांचे सखोल ऑडिट करून,१० वर्षे टिकतील असे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना प्राधान्य असणारे महापालिकेचे स्वतंत्र पदपथ धोरण तसेच फेरीवाला धोरण लागू करणार असुन जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मंजुरीसाठी एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार असल्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.






