लोकोत्तर समाजधुरीण

पांडुरंग भाबल


मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, लोकोत्तर समाजधुरीण, बहुभाषाकोविद, भारतीय इतिहास संशोधनाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रकाशित केलेल्या "दर्पण" या मराठी वृत्तपत्राचा स्थापना दिन ६ जानेवारी हा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जांभेकर यांच्या कार्याचे पुण्यस्मरण...


आ चार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म हा देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे २० फेब्रुवारी, १८१२ रोजी झाला. जांभेकर घराणे मूळचे गोव्याचे असून तेथील पोर्तुगीज राजवटीला कंटाळून शेजारच्या कोकणात आले. ऋग्वेदी कौशिक गोत्री, कऱ्हाडे ब्राह्मण असून ते 'भट' शाखेचे होते. गोव्यातील म्हाळसादेवी हे त्यांचे कुलदैवत. त्यांचे घराणे ग्रामोपाध्ये असून एक प्रमुख मानकरी आहेत. गंगाधरशास्त्री व सगुणाबाई या दाम्पत्याच्यापोटी दुसरे अपत्य म्हणून बाळकृष्ण यांचा जन्म झाला. मराठी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याने बाळबोध, गीतपाठ, वेदपठण, अमरकोश, लघुकौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केल्याने ते 'बालबृहस्पती' या नावानेही ओळखले जायचे. मराठी व संस्कृत शिवाय अनेक देशीविदेशी भाषांची उत्तम जाण त्यांना होती. परिणामी १८२५च्या सुमारास त्यांनी मुंबईत येऊन इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. विद्यार्थीदशेतच त्यांनी गणिती परिभाषा व्याकरण, ज्योतिषशास्त्र, इतिहास व भूगोल आदींवर मराठीत ग्रंथनिर्मितीचे महान कार्य करण्याची किमया त्यांनी अवघ्या १७व्या वर्षी पार पाडून डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी व शाळा तपासणीस म्हणून नोकरी केली. भारतीय इतिहास संशोधनाचे जनक म्हणून परिचित असताना अक्कलकोट येथील संस्थानात युवराजांचे गुरू, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कामगिरी बजावली. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटी व इंग्लंडमधील भौगोलिक संस्थेच्या नैपुण्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता. न्या. चंदावरकर यांनी त्यांचा 'आद्यऋषी' असा गौरव केला होता. सामाजिक विचारमंथन करण्याच्यादृष्टीने त्यांनी प्रथम इंग्रजी दैनिक 'बॉम्बे दर्पण' सुरू केल्यानंतर शुक्रवार दि. ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राची स्थापना करून मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. त्याचे मालक व संपादक ते स्वतःच होते. विसाव्या वर्षीच हे धाडस करून मराठी पत्रकारितेचा पाया घालणारे ते आद्यपत्रकार ठरले. याची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस राज्यभर 'पत्रकार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. समाजसुधारक म्हणून भूमिका पार पाडताना त्यांनी लोकांना पाश्चात्त्य ज्ञान, विद्या देत समृद्धी व लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करण्याचे दर्पणच्या पहिल्याच अंकातून सूतोवाच केले होते. या कामी त्यांना बराच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. दुर्दैवाने अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले दर्जेदार वृत्तपत्र १ जुलै १८४० रोजी बंद करणे भाग पडले.


सरकारी नोकरी सांभाळून देशातील चळवळींना हातभार लावताना कुणाचेही मिंधेपणा त्यांनी स्वीकारला नाही. म्हणूनच त्यांना अष्टावधानी व बुद्धिवंतांचे अग्रदूत तसेच ज्ञाननिष्ठ समाजधुरीण म्हटले जाते. राजा राममोहन रॉय यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण तसेच दुष्ट रूढी, परंपरा व अज्ञान याविषयी समाजप्रबोधन केले. त्याचवेळी सरकारने धार्मिक शिक्षणामध्ये कोणताही हस्तक्षेप न करता तटस्थ राहावे असा आग्रह धरला. वाचकांच्या टीकेला, विरोधी मताला सन्मानाचे स्थान देण्याची संस्कृती त्यांनी जोपासली. ते हिंदू धर्माभिमानी व सुधारणावादी तर होतेच तसेच शिक्षण हेच प्रगतीचे साधन म्हणून ओळखणारे ते पहिले लोकोत्तर पुरुष होते. आज काही वृत्तपत्रांनी वाचक पत्रांचे स्तंभ मात्र बंद केले याची खंत वाटते. वृत्तपत्र हे समाजाच्या जाणिवेचे संस्कारण करणारे प्रभावी साधन व माध्यम असल्याने पत्रकार हा सुबुद्ध, व्यासंगी, शीलवान व समाजहितैशी असावा असा त्यांचा प्रामाणिक आग्रह असे. संपादकांच्या चुका सदभावाने दाखवण्याची परंपरा ही दर्पणनेच घालून दिली. १९४० मध्ये त्यांनी 'दिग्दर्शन' नावाचे मासिक सुद्धा सुरू केले होते. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत सरकारने त्यांना जे.पी. ही मानाची पदवी देऊन गौरवले. बाळशास्त्री यांनी प्रामुख्याने नितीकथा, सारसंग्रह, इंग्लंडची बखर, बाल व्याकरण, भूगोलशास्त्र, शब्दसिद्धी-निबंध, समीकरण विषयांवर टिपणे, हिंदुस्थानचा इतिहास, गणित, मानव शास्त्र, हिंदुस्थानातील ब्रिटिशांचा इतिहास आदी ग्रंथ लिहिले. संशोधक म्हणून प्राचीन लिप्यांचा अभ्यास करताना कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांवर शोधनिबंध, ज्ञानेश्वरी काव्य ग्रंथाचे प्रकाशन व इंग्रजी-मराठी धातुकोशही लिहिला.


१८४५ मध्ये 'नेटिव्ह इंपृव्हमेंट सोसायटी' व बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी यांची स्थापना केली. ध्येयसक्ती पोटी केलेल्या अतिश्रमांमुळे अलिबाग येथे त्यांना विषमज्वराची लागण झाली. त्यानंतर उपचारासाठी मुंबईत आल्यावर १८ मे १८४६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे त्यांचे छोटेसे स्मारक अाहे. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र काहीसा डळमळीत झाल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. त्यामुळे पत्रकारांनी आपली भूमिका अगदी निर्भीडपणे बजावणे क्रमप्राप्त आहे. तरच बाळशास्त्रींचा वारसा पुढे सुरू राहील. तसेच मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तो घसरणार नाही याची दक्षता घेणेही गरजेचे आहे. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे. कारण तिथेच जांभेकर यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती. त्यांच्या जन्मभूमीत ओरोस(सिंधुदुर्ग)येथे त्यांच्या नावे भव्य स्मारक तथा 'पत्रकार भवन' बांधण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने त्यांचा थोर राष्ट्रपुरुष अभिवादन यादीत समावेश करून त्यांना अभिवादन करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत; परंतु अद्यापही एशियाटिक लायब्ररीत मात्र त्यांचे तैलचित्र न लावल्याबद्दल खेद वाटतो. तसेच शासनाने त्यांच्यावर अभ्यासक्रमात धडा समाविष्ट करून 'पत्रकार विद्यापीठ' स्थापन करावे अशीही मागणी आता पुढे येत आहे. अशा या थोर आद्य पत्रकारास कोकणवासीयांतर्फे मानाचा मुजरा!

Comments
Add Comment

मध्य महाराष्ट्रातल्या रोमांचक लढतींनी वाढणार निवडणुकीत रंगत

पुणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक केवळ सत्तास्थापनेसाठीचीच नाही, तर अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

देशातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग

प्रा. सुखदेव बखळे (लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.) मध्य प्रदेशमधील घनदाट नौरादेही येथील वीरांगना राणी

दक्षिण महाराष्ट्रात 'सांगली पॅटर्न'ची चर्चा

'सांगली पॅटर्न' पाहून कोल्हापूर आणि इचलकरंजीतील राजकीय डावपेचांचा वेध घेतला, तर दक्षिण महाराष्ट्रातदेखील भाजप

सोमनाथ स्वाभिमान पर्व- एक हजार वर्षांची अढळ श्रद्धा

सोमनाथ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आणि हृदयात अभिमानाची भावना जागृत होते. हे भारताच्या आत्म्याचे शाश्वत

जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे

पंचायत समितीपेक्षा अधिक उमेदवारीसाठी रस्सीखेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होऊ शकेल. पंचायत समिती सदस्यासाठी

'प्रहार' शनिवार विशेष- रेखाची रोजिनिशी

मोहित सोमण नाव रेखाची रोजिनिशी मला आजही हा धडा आठवतो. २००२ साली माध्यमिक शिक्षण घेत असताना मला आजही तो धडा