हिंदू धर्मात भगवान श्रीगणेशाला समर्पित असलेले संकष्ट चतुर्थी व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हे व्रत केले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. नववर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी कधी आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अंगारक संकष्ट चतुर्थी 2026 तिथी व वेळ
चतुर्थी तिथी प्रारंभ: मंगळवार, 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.01 वाजता
चतुर्थी तिथी समाप्त: बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.52 वाजता
व्रताची मुख्य तारीख: मंगळवार, 6 जानेवारी 2026
पंचांगानुसार या दिवशीच अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल.
श्री गणेश पूजनासाठी आवश्यक साहित्य
श्रीफळ (नारळ)
चौरंग
हळद, कुंकू, गुलाल
दुर्वा, जास्वंदाची फुले
शेंदूर, चंदन, रक्तचंदन
कापूर, अष्टगंध, अक्षता
पंचामृत
उदबत्ती, धूप
समई, निरांजन
फुले, फळे, प्रसाद व नैवेद्य
अंगारक संकष्ट चतुर्थी पूजा विधी
पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि व्रताचा संकल्प करावा.
चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर श्रीगणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
गणेशमूर्तीचा प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने अभिषेक करावा.
अभिषेक करताना गणपती मंत्राचा 108 वेळा जप करावा.
गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्राचे पठण करावे.
चंद्रोदयाच्या वेळी धूप, दीप, फुले अर्पण करून पूजा करावी.
श्रीगणेशाला नैवेद्य दाखवावा.
चंद्रदर्शन घेऊन अर्घ्य अर्पण करावे आणि त्यानंतर व्रत सोडावे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ (6 जानेवारी 2026)
मुंबई: रात्री 9.22
ठाणे: रात्री 9.20
पुणे: रात्री 9.17
नाशिक: रात्री 9.16
कोल्हापूर: रात्री 9.18
सोलापूर: रात्री 9.10
नागपूर: रात्री 8.53
छत्रपती संभाजीनगर: रात्री 9.10
रत्नागिरी: रात्री 9.21
सांगली: रात्री 9.16
अमरावती: रात्री 8.58
नांदेड: रात्री 9.02
जळगाव: रात्री 9.08
पणजी: रात्री 9.21
अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा
(Angaraki Sankashti Chaturthi Katha 2026)
प्राचीन काळी अवंती नगरीत, क्षिप्रा नदीच्या काठावर महर्षी भारद्वाज आपल्या आश्रमात राहात होते. ते अत्यंत तपस्वी, विद्वान आणि भगवान श्रीगणेशाचे निष्ठावान भक्त होते. आश्रमात येणाऱ्या बालकांना ते श्रीगणेशाची भक्ती, जप व पूजा शिकवत असत. मात्र त्यांना स्वतःचे अपत्य नव्हते.
एके दिवशी भारद्वाज मुनी क्षिप्रा नदीत स्नान करून नदीकिनारी ध्यानधारणा करत बसले होते. त्याच वेळी देवर्षी नारद तेथे प्रकट झाले. त्यांनी मुनींना ध्यानातून बाहेर आणत सांगितले की, “भगवान श्रीगणेश तुमच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत.”
तेवढ्यात मुनींच्या समोर एक तेजस्वी बालक प्रकट झाले. नारदांनी सांगितले की, हे बालक म्हणजे श्रीगणेशांनीच वरदानरूपाने दिलेले आहे. हे ऐकून भारद्वाज मुनी आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या बाळाला प्रेमाने उचलून घेतले.
ते बालक लालसर, तेजस्वी आणि अग्नीसारखे दैदीप्यमान होते. त्यामुळे भारद्वाज मुनींनी त्याचे नाव ‘अंगारक’ असे ठेवले. पुढे हेच अंगारक मंगल ग्रहाचे प्रतीक मानले गेले. मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी म्हणूनच अंगारक संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी मानली जाते.
असे मानले जाते की, या दिवशी श्रद्धेने श्रीगणेशाची उपासना केल्यास संकटे दूर होतात, इच्छापूर्ती होते आणि जीवनात शुभत्व प्राप्त होते.