मुंबई : महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भाजपाच्या बंडखोर उमेदवाराने माघार न घेतल्याने शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, या प्रकरणावर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
सोमवारी नियमित कामकाज सुरू होताच सायन कोळीवाडा मतदारसंघासह विविध निवडणूकविषयक याचिका सुनावणीसाठी मांडण्यात आल्या. मात्र, कोणत्याही याचिकेवर तातडीने सुनावणी घेता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पूजा कांबळे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्रतीक्षा नगर येथील प्रभाग क्रमांक १७३ भाजपाने शिवसेनेसाठी सोडला असतानाही भाजपाच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळूसकर यांनी तेथून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने अधिकृत एबी फॉर्म दिलेला नसतानाही केळूसकर यांनी कथित बनावट एबी फॉर्म सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
उमेदवारी अर्ज भरताना यावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप दुर्लक्षित करत केळूसकर यांचा अर्ज स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयाला आव्हान देत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.
याचिकेत काय मागणी?
याचिकेत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून भरलेला शिल्पा केळूसकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांना भाजपाचे अधिकृत निवडणूक चिन्ह कमळ देऊ नये, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती.
या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सकाळच्या सत्रात मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यानंतर इतरही तत्सम निवडणूक याचिकांवर तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली, मात्र त्यावरही न्यायालयाने नकार दिला.