Wednesday, January 7, 2026

मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी मागवला ‘बिनविरोध निवडी’चा अहवाल

मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी मागवला ‘बिनविरोध निवडी’चा अहवाल

उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल

आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी सादर केले पुरावे

मुंबई : राज्यातील १० महापालिकांमध्ये तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने, या प्रक्रियेला आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ठाणे आणि कल्याणमधील बिनविरोध निवडीचा अहवाल तातडीने मागवून घेतला असून, ‘बिनविरोध’ निवडीप्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयुक्तांना ठाणे आणि कल्याणमधील स्थिती सांगितली. निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) ज्यापद्धतीने वागले, पैशांच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले.

आमच्याकडे असणाऱ्या काही खासगी गोष्टीही त्यांना दाखवल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ ठाण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणे केले असून, या संपूर्ण गोष्टींचा अहवाल आजच्या आज मागवला आहे.

त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी पुढे जाईल? याबाबत आम्हाला पुन्हा बोलावून सांगणार आहेत, असे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी किती बिनविरोध आलेत, याबाबत विचारले. मी त्यांना कल्याण-डोंबिवलीतील २१ आकडा सांगितला, तेव्हा त्यांचेही डोळे मोठे झाले. एका महत्त्वाच्या महापालिकेत २१ जण बिनविरोध निवडून येणे, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडले नाही. राज्य निवडणूक आयुक्तांनाही या सर्व प्रकाराचे गांभीर्य कळाले आहे, असे मला वाटते, असे अविनाश जाधव म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा