मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘मुरांबा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या शशांकने काही दिवसांपूर्वी एका निर्मात्याकडून मानधन थकवल्याचा आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्या वेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं.
आता शशांकने थेट संबंधित निर्मात्याचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. ‘हे मन बावरे’ या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर त्याने मानधन न दिल्याचा आरोप केला असून, दोघांमधील संभाषणाचे काही स्क्रीनशॉट्स आणि एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओच्या माध्यमातून बोलताना शशांक म्हणाला की, पुन्हा एकदा तक्रार मांडण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. हा व्हिडीओ ट्रोल होईल, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील याची जाणीव असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. काही लोक हे केवळ मनोरंजन म्हणून पाहतील, तर काहींना वाटेल की तो कायम तक्रारीच करत असतो. मात्र, अभिनय हा आपला व्यवसाय असून प्रामाणिकपणे काम केल्यानंतर मोबदला मिळणं हा कलाकाराचा हक्क आहे, असं शशांकने सांगितलं.
पोस्टमध्ये शशांकने म्हटलं आहे की, कायदेशीर कारवाई तो करत आहेच, मात्र मंदार देवस्थळी यांचा थापा मारण्याचा आणि वेळ काढण्याचा पॅटर्न लोकांच्या लक्षात यावा म्हणून तो हा व्हिडीओ स्क्रीनशॉटसह शेअर करत आहे. पैशाचा विषय स्वतः कधीच काढला जात नाही, पण कलाकारांनी पैसे मागितले की समोरचा रडतो, गयावया करतो, गोड शब्द वापरतो आणि शेवटी कलाकारच मूर्ख ठरतो, असा आरोपही त्याने केला आहे.
पुढे बोलताना शशांकने सांगितलं की, ५ लाख रुपये ही रक्कम कोणासाठी मोठी असेल किंवा नसेल, पण त्याच्यासाठी ती नक्कीच मोठी आहे. ‘हे मन बावरे’ मालिकेचे पर डे प्रमाणे ठरलेले मूळ पैसे कसाबसा मिळाले, मात्र पेमेंट करताना कापलेला TDS अजूनही सरकारकडे भरलेला नाही. यामुळे दुहेरी गैरप्रकार झाला असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
ही समस्या फक्त आपल्यापुरती मर्यादित नसून अनेक कलाकारांची अशीच परिस्थिती असल्याचं शशांकने स्पष्ट केलं. काही जणांचे तर मूळ मानधन आणि TDS दोन्ही थकले असल्याचंही त्याने सांगितलं. सध्या आपण फक्त स्वतःच्या प्रकरणाबाबत बोलत असल्याचं त्याने नमूद केलं आहे.
शशांकने यूट्यूबवरील जुन्या मुलाखतींचा उल्लेख करत मंदार देवस्थळी यांचा वेळ काढण्याचा पॅटर्न पूर्वीपासूनच दिसून येतो, असंही म्हटलं. आमच्या पैशाचं नेमकं काय केलं, याबाबत तो कधीच स्पष्ट उत्तर देत नाही, असा आरोपही त्याने केला आहे.
पोस्टच्या शेवटी शशांकने स्पष्ट केलं की, या प्रकरणाचा परिणाम होणार असेल तर त्याची जबाबदारी तो किंवा त्याची टीम घेणार नाही. मात्र, सर्वच निर्माते असे नसतात, हेही आवर्जून सांगत हा आरोप फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी यांच्यापुरताच असल्याचं त्याने स्पष्ट केलं. इंडस्ट्रीतील चांगल्या निर्मात्यांनी कलाकारांच्या मेहनतीचा सन्मान ठेवत वेळेत मानधन द्यावं, असं आवाहनही शशांकने केलं आहे.






