Wednesday, January 7, 2026

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपूरवरून मुंबईच्या दिशेने ही खाजगी बस सुसाट वेगाने धावत असताना, शिवणी पिसा गावाजवळ चालकाला बसमधून धूर येत असल्याचे जाणवले. त्याने वेळ न घालवता तात्काळ बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि आरडाओरड करून प्रवाशांना सावध केले. झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने संपूर्ण बसला वेढले. काही मिनिटांतच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

प्रवासी सुरक्षित, पण जखमींवर उपचार सुरू

या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असले तरी, घाईघाईत बसमधून उतरताना काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर बसला आग लागून २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतरही खाजगी बसेसची तपासणी आणि महामार्गावरील अग्निशमन सुविधांबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. या आगीच्या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >