सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना आता एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानकडून होत आहे. मात्र काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाचे आरोप फेटाळले आहेत.
नक्की घडलं काय ?
प्रभाग क्रमांक १६ मध्ये ठाकरे गटाकडून उमर गवंडी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. याच दबावामुळे उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दोन्ही राजकीय गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित केली.
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत म्हटले की, उमेदवाराला प्रचार करू दिला जात नाही, दडपशाही आणि धमक्यांचे प्रकार सुरू आहेत. या संदर्भातील पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकशाहीत अशा प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गंभीर आरोप होत असताना काँग्रेसकडून स्पष्टीकरण आले आहे. प्रभाग अर्थात वॉर्ड १६ मध्ये प्रचार सुरू आहे. कुणावर दबाव टाकला नाही. घरगुती कारणामुळे उमेदवाराची आई विषबाधित झाली होती; तिची तब्येत आता ठीक आहे.