छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत, असे ते म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत. या बिनविरोध निवडीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेत, त्यांच्यासमोर पुरावे सादर केले. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, बिनविरोध निवडींचे समर्थन केले. मुंबई आणि ठाण्यातील अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या विरोधात मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, "निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही कधीच विरोध केला नाही. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे." राज ठाकरेंनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.






