Wednesday, January 28, 2026

ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने आता थेट जपानच्या दिशेने मिसाईल डागले आहेत. या दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून कराच्याबाबतीत शांत असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट सार्वजनिक भाषणात करवाढीची धमकी देत पुन्हा एकदा टॅरिफचे हत्यार उपसले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास ५० टक्के आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे वक्तव्य एका सार्वजनिक भाषणात केले आहे. तर याच भाषणामध्ये दुसरीकडे ट्रम्प यांनी मोदींचे कौतुकही केले. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खूप चांगले माणूस आहेत. त्यांना माहीत होते की, मी रागावलेलो आहे. त्यामुळे ते माझा राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांनी रशियन तेलाच्या मुद्द्यावर सहकार्य न केल्यास भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवले जाऊ शकते.

ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले होते. भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापाराबाबत ते नाराज होते आणि त्यांनी याचा अनेकदा उल्लेखही केला होता. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार (ट्रेड डील) बराच काळ प्रलंबित राहिला होता. ट्रम्प यांची इच्छा होती की भारताने आपला संपूर्ण बाजार अमेरिकेसाठी खुला करावा तसेच दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश द्यावा. मात्र, भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.

भारत आणि रशिया यांचे संबंध अनेक वर्षांपासून चांगले असून दोन्ही देशांमध्ये व्यापारही सुरू आहे. ट्रम्प यांची नाराजी याच कारणामुळे असल्याचे दिसून येते आणि त्यांच्या ताज्या विधानातही याचा उल्लेख आहे. दरम्यान, सध्या ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या एका ऑपरेशनमुळेही चर्चेत आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात आता न्यायालयीन कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment