२७ वाढीव फेऱ्यांचा समावेश
मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो-३ भुयारी मार्गिकेवर प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 'अॅक्वा लाइन'वर म्हणजेच मेट्रो-३ मार्गिकेवर सोमवार, ५ जानेवारीपासून मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पीक अवरमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून, याचा थेट फायदा दैनंदिन प्रवाशांसह वीकेंडला प्रवास करणाऱ्यांनाही होणार आहे. यामध्ये २७ वाढीव फेऱ्यांचा समावेश असेल.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या मार्गावर धावणाऱ्या भुयारी मेट्रोला सकाळी आणि सायंकाळी खूप गर्दी असते. मेट्रो सेवा नुकतीच सुरू झाल्यामुळे सुरुवातीला मर्यादित फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, गाड्यांमधील जास्त अंतरामुळे पीक अवरमध्ये प्रवाशांची गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्याच्या दिवशी पीक आव्हरदरम्यान फेऱ्यांमध्ये २६५ वरून वाढ करून २९२ करण्यात आली आहे. म्हणजेच २७ वाढीव फेऱ्यांचा समावेश असेल. शनिवारी या फेऱ्या २०९ वरून वाढून २३६ करण्यात आल्या आहेत. रविवारी कोणताही बदल करण्यात आलेला नसून १९८ फेऱ्या कायम राहणार आहेत.
अधिकाऱ्यांनी प्रवाशांना अद्ययावत वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावरील सायन्स सेंटर, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकर शेठ (मुंबई सेंट्रल), ग्रँट रोड, गिरगाव, कळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड ही स्थानके अनेक प्रवेश-निर्गमन बिंदूंनी सुसज्ज आहेत. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या एकमार्गी प्रवासासाठी ७० रुपये भाडे आकारले जाते. दरम्यान, १ तेइ३१ ऑक्टोबर या कालावधीत अॅक्वा लाइनने ३८,६३,७४१ प्रवाशांची वाहतूक केली असून, उपनगर आणि दक्षिण मुंबई यांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.






