Tuesday, January 6, 2026

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नसल्याने आता ते शाखा भेटींवर भर - चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत नसल्याने आता ते शाखा भेटींवर भर - चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे

मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नसल्याने ते शाखांना भेटी देत फिरत आहेत”, अशी बोचरी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. मुंबईकर त्यांच्या प्रलोभनांना बळी पडणार नसून, मुंबईसह राज्यातील जनता विकासाच्या मागे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील १० महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगात तक्रार आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविषयी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “नगरसेवक बिनविरोध निवडून आले म्हणून मनसेने न्यायालयात जाण्याची गरज नव्हती. निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? जनतेला विकास होईल, असे वाटले म्हणून तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले”, असा युक्तिवाद बावनकुळे यांनी केला.

“नगरसेवक बिनविरोध निवडून येणे, हा चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही विरोध केला नाही. यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे”, असा प्रतिसवाल बावनकुळे यांनी केला. प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेविषयी बावनकुळे यांनी भाष्य केले. “प्रणिती शिंदे या कधीही भाजपच्या भेटीला आल्या नाहीत. त्या आमच्या संपर्कातही नाहीत. उगाच एखाद्याचे करिअर कशाला उद्ध्वस्त करता”, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >