Wednesday, January 28, 2026

संत नामदेव

संत नामदेव

- डॉ. देवीदास पोटे

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥ मागे बहुतांचे फेडियले ऋण । आम्हांसाठी कोण आली धाड ॥३॥ वारंवार तुज लाज नाही देवा । बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥

पंढरपूरचा विठ्ठल हा भक्तांचा सखा-सोयरा आणि सर्व काही? तो भक्तांच्या सुख-दुःखांशी समरस होतो. अडचणीच्या वेळी त्यांना सहाय्य करतो. या अभंगात संत नामदेव म्हणतात, 'पंढरीत निवास करणाऱ्या सख्या पांडुरंगा, तू आपल्या भक्तांना तुझा सहवास घडव. तू भक्तांचा कैवारी आहेस, हे सांगताना तुला कमीपणा वाटतो का? यापूर्वी तू अनेकांचे ऋण फेडलेस. परंतु आता माझ्या बाबतीत तुला कशाची उणीव भासते आहे? हे देवा, तुला कितीवेळा विनवणी करून सांगावे? पण तुला काहीच वाटत नाही. तू मौन बाळगून राहातोस. हे केशवा, तू हे मौन आता सोड.'

'पंढरीनिवासा पांडुरंग' म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. तो पंढरपूर नगरीचा राजा आहे. अवघ्या जनांचा स्वामी आहे. संत नामदेव यांचे वास्तव्यही पंढरपूरला होते. ते देवाचे सर्वात जवळचे भवत अशी त्यांची ख्याती आहे. "भक्तांचा कैवारी" हे बिरुद मिरविण्यात तुला लाज वाटते की काय, असा खडा सवाल ते देवाला करतात. इतर अनेकांच्या बाबतीत आपल्या ब्रीदाला जागणार देव आपल्या बाबतीत मात्र उदासीन का, हे कोडे नामदेवांना काही केला उमगत नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा विठ्ठलाची मनोभावे आळवणी करून देवाने "भक्तसखा" व्हावे आणि आपल्याला आपलेसे करावे असे सांगत आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलाने भक्ताशी "अंगसंग करावा म्हणजे त्याच्या सहवासात रहावे असे संत नामदेव सांगत आहेत. 'अंगसंग' या शब्दातून अर्थाच्या अनके छटा प्रकट झाल्या आहेत. अंगसंग या शब्दांतून अर्थाच्या अनेक छटा प्रकट झाल्या आहेत. संत नामदेव प्रतिभासंपन्न कवी होते. शब्द, काव्य आणि संगीत यावर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. या अभंगाच्या ओळीओळीतून संगीताची लय सहजपणे पाझरते आहे, असे जाणवते. पंडित भीमसेन जोशी यांनी मारू विहाग या रागात गायिलेल्या या अभंगाचे शब्द स्वरांकित होऊन भक्त हृदयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचले आणि त्यातील नामदेवांच्या मनोगतातील आशय अधिक ठळकपणे अधोरेखित झाला.

Comments
Add Comment