ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात
ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी ८६ अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. १३१ जागांसाठी झालेल्या जागावाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. नेत्यांनी ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळवले, तरी काही ठिकाणी बंडखोर अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत. २०१७ मध्ये ठामपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली, मात्र कोरोनामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
तब्बल चार-पाच वर्षांनंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट), मनसे, उबाठा गट या पक्षांतून इच्छुकांची संख्या जास्त होती.
मात्र महायुतीत जागा वाटपात कमी-अधिक जागा आल्यामुळे पक्षश्रेष्ठींना सर्वांना न्याय देता आला नाही. निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. बंड थोपविण्यात ९० टक्के यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक नाराजी किंवा व्यक्तिगत आवेशातून अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांमुळे राजकीय पक्षांना आव्हान निर्माण झाले आहे. १३१ जागांसाठी १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला, त्यापैकी ५५ उमेदवारांनी माघारी घेतली, तर प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड शमविण्यात यश आले असले तरी अपक्ष उमेदवारांसह बंडखोरीचे आव्हान कायम राहणार आहे.
उमेदवार बॅकफूटवर
निवडणूक होण्याआधीच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक पक्षाचे उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे.






