मुंबई : “राज्यात आतापर्यंत ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात एकट्या मेघना बोर्डीकर यांनी १ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यावर्षी १ कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी परभणी येथील प्रचारसभेत दिली.
विधानसभेच्या निवडणुका झाल्या, की ‘लखपती दीदी’ योजना बंद केली जाईल, असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, बहुमत मिळाल्यानंतरही भाजपने ही योजना बंद केली नाही. जोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत ‘लखपती दीदी’ किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.
त्याचप्रमाणे परभणीच्या विकासाच्या जो आड येईल, त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रभावतीच्या या नगरीत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, की किती वर्षे आपण इतिहासात सांगणार आहोत? आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे. इतिहासात जगणारे, इतिहासातच मरून जातात. इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो. त्यामुळे येत्या १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, त्यानंतर पाच वर्षांसाठी ‘देवाभाऊ’ तुमची काळजी घेईल”, असे आवाहन त्यांनी केले.






