Tuesday, January 6, 2026

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

Prasad Lad :

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पूर्णविराम दिला आहे. "नारायण राणे हे आमची शक्ती आणि ऊर्जा आहेत, ते कधीही राजकारणातून निवृत्त होऊ शकत नाहीत," अशा शब्दांत लाड यांनी राणेंचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली मते परखडपणे मांडली.

'संविधानासाठी गुन्हे अंगावर घ्यायला तयार'

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी निघालेल्या अटक वॉरंटवर बोलताना लाड म्हणाले, "आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी लढा दिला होता. त्या रॅलीच्या विरोधात तत्कालीन ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. आज आमचे वॉरंट रद्द झाले असून जामीन मिळाला आहे. संविधानाचा लढा आमचा कायम राहील, असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत."

राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण वादावर स्पष्टीकरण

नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात काही वाद असल्याच्या चर्चेचा लाड यांनी इन्कार केला. "रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राणे साहेब देशाचे मोठे नेते आहेत. राणे साहेब इतके ज्येष्ठ आहेत की ते आमच्या सारख्यांचे कान पकडून आम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे, चव्हाण त्यांचा प्रचंड आदर करतात," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

महापालिकेत १५० पार; ठाकरेंना लगावला टोला

मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत भाष्य करताना लाड यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. "महायुती १५० हून अधिक जागा जिंकेल. उद्धव ठाकरेंनी सध्या जी 'हिरवी चादर' पांघरली आहे, ती हिंदुत्वाच्या भगव्या लाटेत वाहून जाईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना त्यांची जागा कळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचाच झेंडा फडकेल," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा