येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये बिबट्यांचे दर्शन वाढले असून, शुक्रवारी (ता. २) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यांनी दोन श्वानांवर हल्ला करून त्यांची शिकार केल्याने येऊर आणि वागळे इस्टेट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री येऊर परिसरातील वस्तीमध्ये बिबट्याने शिरकाव करून एका पाळीव श्वानाला उचलून नेले. याच रात्री येऊरच्या प्रवेशद्वाराजवळही बिबट्याचे दर्शन झाले असून, त्यानेही एका श्वानाला आपले भक्ष्य बनवले. या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, गृहनिर्माण सोसायट्या आणि पाड्यांमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या आठवड्यातील बिबट्या दिसण्याची ही दुसरी घटना आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ६० हून अधिक बिबटे आहेत. जंगलात नैसर्गिक शिकार मिळण्याऐवजी मानवी वसाहतींमध्ये सहज उपलब्ध होणारे श्वान, मांजरे, कोंबड्या व बकऱ्या यांसारखे प्राणी बिबट्यांना आकर्षित करत आहेत.
त्यामुळे संरक्षक भिंती असूनही बिबट्या रात्रीच्या वेळी पाड्यांमध्ये शिरकाव करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉसमॉस सोसायटी परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोनचा वापरही केला होता. ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊर परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी रात्री एकट्याने घराबाहेर पडू नये, तसेच लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
“बिबट्यांचा हा परिसर त्यांच्या नेहमीच्या वावरण्याचा मार्ग आहे. जरी आतापर्यंत मानवावर हल्ल्याच्या घटना घडल्या नसल्या, तरी खबरदारी म्हणून पाड्यांच्या परिसरात गस्त वाढवली आहे,” अशी माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.






