Monday, January 5, 2026

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने मोठ्या शिताफिने जेरबंद केले होते. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न होताच, सॅटेलाईट कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. जी.पी.एस. कॉलरच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींचा अभ्यास करून मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यास मदत होणार आहे, असे संचालक अनिता पाटील यांनी सांगितले.

भाईंदर पारिजात सोसायटीत शिरलेल्या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वन विभागाने पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले. बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच जखमी नागरिकांची दवाखान्यात भेट घेवून विचारपूस केली. वनमंत्री महोदयांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार बंदिस्त बिबटयाला सॅटेलाईट कॉलर लावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य आणि मुख्य वनसंरक्षक मुंबई सर्वानुमते निर्णय घेतला. बिबटयास बोरीवली प्रशासना मार्फत सॅटेलाईट कॉलर व मायक्रोचिप बसविण्यात आली व वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वन विभागाने संयुक्तपणे अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. बिबट्या निसर्गमुक्त केलेल्या परिसरातच असून त्याच्या नैसर्गिक अधिवासात तो स्थिरावत आहे. तसेच त्याचा वावर नैसर्गिक अधिवासात असल्याचे दिसत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा बिबट्या वयाने लहान असून नुकताच आईपासून वेगळा झाल्याने, वाट चुकल्यामुळे तो शहरात आला असावा. राज्यात बिबट्यांशी संबंधित संघर्ष वाढत आहे त्याच्या हालचाली समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्याला रेडिओ कॉलर लावून जंगलात सोडण्यात आले आहे.

- गणेश नाईक, कॅबिनेट मंत्री (वने), महाराष्ट्र शासन

वन विभाग सार्वजनिक सुरक्षेबाबत वन्यजीव संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. जी.पी.एस. कॉलरमुळे बिबट्याच्या सुटकेनंतर त्याच्या हालचालींचे निरीक्षण करता येते आणि योग्य व्यवस्थापन निर्णय घेणे शक्य होते. अशा उपाययोजनांमुळे मानव आणि वन्यजीवांमध्ये सहअस्तित्व साधण्यास मदत होते.

- अनिता पाटील, वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

Comments
Add Comment