Monday, January 26, 2026

राणे कुटुंबीयांना संपवणे शक्य नाही!

राणे कुटुंबीयांना संपवणे शक्य नाही!

खासदार नारायण राणे यांचा ठाम विश्वास

कणकवली : "राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो. माझ्या विरोधात सर्व करून झाले. मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही. तुमची ही उपस्थिती, तुमचे स्वागत आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही. राणे एकसंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत. कार्यकर्त्यांनी डगमगायचे नाही. मी समर्थ आहे. असा विश्वास भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला. कणकवली येथे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तरीत्या भरवलेल्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार राणे यांच्या उपस्थितीत प्रचंड जनसागराकडून घोषणाबाजी होत होती. नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा जयघोष करणाऱ्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

यावेळी खासदार राणे म्हणाले, ‘जिल्ह्यात राजकारणाला थारा देवू नका. माझ्या रस्त्यात आलात तर थारा देणार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक व्हा. हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली. कोणामुळे आली. कशासाठी आली. मी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी सांगितलं, मी माझ्या आयुष्यातील भाजप शेवटचा पक्ष आहे. येथेच याच पक्षात काम करत राहणार. त्यामुळे चर्चा करायची काही गरज नाही. मात्र जगावे ती स्वाभिमानाने ही माझी वृत्ती आहे. ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातक आहे की काय असे नेहमी वाटते. एवढी पदे भूषविली.त्या त्या पदाला न्याय दिला. जनतेला मदत केली. हे माझ्यासाठी नाही, माझ्या ध्येयासाठी मी काम केले, जनतेसाठी त्यांच्या विकासासाठी केले. अनेक पदे मिळविली मी शिवसैनिक झालो आणि वर्षभरात नगरसेवक झालो, मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक झालो, चेअरमन झालो. १९९० मध्ये कार्यकर्ते, जनता आणि देवांच्या आशीर्वादाने मी कणकवलीचा आमदार झालो. मला संधी मिळाली तर जिल्ह्यातील गरिबी ठेवणार नाही. असा त्यावेळी संकल्प केला होता. त्यात मी यशस्वी झालो आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत तीन लाख दरडोई उत्पादन येथील जनतेचे करायचे आहे. असे सुख येथील जनतेला निर्माण करून द्यायचे आहे.

मी कोकणासाठी वेडा आहे. जन्म गाव, येथील निसर्ग, माणसांसाठी वेडा आहे. मला फक्त येथील जनता हवी, हीच माझी संपत्ती आहे. आतापर्यंत मी दहा पदे भुषविली. ही तुमची, जनतेची, देवाचे आशीर्वाद आहेत. मी कोणापेक्षा कमी आहे, असे वाटत नाही. मी कमी नाही. मी कधीच कुठे कमी पडत नाही. मी नेता आहे. मी ९० नंतर सिंधुदुर्गमध्ये विकास आणला. रस्ते आणि वाहतुकीचे जाळे विणले. राणेंकडून दूर व्हा म्हणून कोटी कोटी वाटले जातात.मात्र माझे कार्यकर्ते असे नाहीत ते निष्ठेने माझ्या सोबत राहिले.तुम्ही सुद्धा पक्ष सांभाळा, निष्ठावंत व्हावा.मला स्वार्थी लोक नको. मी स्वार्थी लोक जोपासले नाहीत.होते ते गेले आणि आता दारोदारी ठोकरे खात आहेत, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment