आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप
नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शत्रूच्या घरात शिरून ड्रोनच्या सहाय्याने अचूक मारा करण्यासाठी लष्कराने अधिकृतपणे 'भैरव स्पेशल फोर्स' या नवीन युनिटची घोषणा केली आहे. या विशेष दलात तब्बल १ लाखाहून अधिक ड्रोन ऑपरेटरचा समावेश असून, आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलण्याची क्षमता या दलात आहे.
पारंपरिक पायदळ आणि निमलष्करी दलांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानावर आधारित युद्ध लढण्यासाठी या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. या दलातील १ लाख सैनिक हे केवळ लष्करी प्रशिक्षणातच नाही, तर 'ड्रोन पायलटिंग', 'प्रिसिजन टार्गेटिंग' आणि 'डिजिटल सर्व्हिलन्स'मध्ये निष्णात आहेत. सध्या १५ 'भैरव बटालियन' कार्यान्वित झाल्या असून, लवकरच ही संख्या २५ पर्यंत नेली जाणार आहे. हे दल 'पॅरा स्पेशल फोर्सेस'च्या तोडीचे काम करेल, मात्र त्यांचा मुख्य भर मानवरहित यंत्रणा आणि हाय-स्पीड स्ट्राइकवर असेल.
नुकत्याच पार पडलेल्या 'अखंड प्रहार' या मोठ्या युद्धसरावात भैरव स्पेशल फोर्सने आपली ताकद सिद्ध केली आहे. दक्षिण लष्करी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या दलाने वाळवंटी आणि दुर्गम भागात ड्रोनच्या सहाय्याने यशस्वी मोहिमा राबवल्या.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी जयपूर येथे होणाऱ्या लष्करी दिनाच्या संचलनात 'भैरव स्पेशल फोर्स' जगासमोर आपले पहिले अधिकृत दर्शन घडवणार आहे. विशेषतः नसीराबाद येथील '२ भैरव' (डेझर्ट फाल्कन्स) ही तुकडी या संचलनाचे मुख्य आकर्षण असेल.
केवळ ड्रोनच नाही, तर भारतीय लष्कराने 'रुद्र ब्रिगेड' (एकात्मिक लढाऊ तुकड्या) आणि 'शक्तिबाण' (प्रगत तोफखाना रेजिमेंट) यांसारखी नवीन युनिट्सही तैनात केली आहेत. सीमावर्ती भागात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ही 'सायबर-फिजिकल' युद्धनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.






