Monday, January 5, 2026

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध

ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म, उमेदवारी अर्जांचा पाऊस, अर्ज बाद होण्यापासून ते माघारीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका निवडणुकांचा खरा प्रचार रणसंग्राम सुरू होणार आहे. उद्या रविवार असल्याने आणि त्यानंतर अवघे दहा दिवस प्रचारासाठी हाती असल्याने प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून दाखल झालेल्या एकूण १ हजार १०७ नामनिर्देशन अर्जांपैकी छाननी आणि माघारीनंतर अखेर ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

दरम्यान, सात ठिकाणी कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याने शिवसेना (शिंदे गट) चे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ठाण्यातील ३३ प्रभागांमधील १३१ जागांपैकी १२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या १ हजार १०७ अर्जांपैकी ९१८ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे चित्र होते.

१ आणि २ जानेवारी या कालावधीत काही प्रभागांत लढत बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. मात्र अखेरीस मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्यानेच काही ठिकाणी समीकरणे बदलली.

माघारीनंतर माजिवडा-मानपाडा, लोकमान्य सावरकरनगर आणि कळवा या प्रभाग समित्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात असून, काही प्रभागांमध्ये तुलनेने कमी उमेदवारांमध्येच लढत होत असल्याचे चित्र आहे. बिनविरोध निवडीचे नाट्य संपल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उमेदवारांची खरी कसोटी लागणार असून, येत्या दहा दिवसांत ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

प्रभाग समितीनिहाय उमेदवारांची संख्या :

माजिवडा–मानपाडा : ९२

वर्तकनगर : ६५

लोकमान्य सावरकरनगर : ८३

वागळे : ३६

नौपाडा–कोपरी : ५२

उथळसर : ५०

कळवा : ८२

मुंब्रा (प्रभाग २६–३१) : ३९

मुंब्रा (प्रभाग ३०–३२) : ५७

दिवा (प्रभाग २७–२८) : ४२

दिवा (प्रभाग २९–३३) : ५१

Comments
Add Comment