मुंबई : राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने, या प्रक्रियेला आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ठाणे आणि कल्याणमधील बिनविरोध निवडीचा अहवाल तातडीने मागवून घेतला असून, ‘बिनविरोध’ निवडीप्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयुक्तांना ठाणे आणि कल्याणमधील स्थिती सांगितली. निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) ज्यापद्धतीने वागले, पैशांच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे व्हिडिओ निवडणूक आयुक्तांना दाखवले. आमच्याकडे असणाऱ्या काही खासगी गोष्टीही त्यांना दाखवल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ ठाण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणे केले असून, या संपूर्ण गोष्टींचा अहवाल आजच्या आज मागवला आहे. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी पुढे जाईल? याबाबत आम्हाला पुन्हा बोलावून सांगणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आयुक्तांनी किती बिनविरोध आलेत, याबाबत विचारले. मी त्यांना कल्याण-डोंबिवलीतील २१ आकडा सांगितला, तेव्हा त्यांचेही डोळे मोठे झाले. एका महत्त्वाच्या महानगरपालिकेत २१ जण बिनविरोध निवडून येणे, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडले नाही. राज्य निवडणूक आयुक्तांनाही या सर्व प्रकाराचे गांभीर्य कळाले आहे, असे मला वाटते, असे अविनाश जाधव म्हणाले.
मनसेची मागणी काय?
- संबंधित ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. उमेदवारांना केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होते, ते कुठल्या पक्षाचे होते, याचीही तपासणी करावी. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचे निकाल राखून ठेवावेत, अशा दोन मागण्यांसाठी आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांकडे केल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
- तसेच बिनविरोध प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या आहेत. निवडून आलेल्या ७० उमेदवारांना विजय घोषित करण्याच्या प्रक्रियेला चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी आणि निवृत्त अधिकारी किंवा उच्च न्यायालयाच्या निगराणीत या सगळ्या प्रकरणाची पुढील चौकशी व्हावी, अशी मागणी त्यात केली आहे, असे जाधव यांनी सांगितले.






