मंत्री नितेश राणे यांची टीका; उबाठाचा महापौर झाला, तर मुंबईत उर्दू शाळा वाढतील
मुंबई : “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात त्यांच्या पूत्राने ठाकरे ब्रँड संपवला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यापासून ठाकरे ब्रँड संपायला सुरुवात झाली. आता १५ जानेवारीनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचे सुद्धा होणार नाहीत, हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे, लोक त्यांना सोडून चालले आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सांगेन, शरीराची क्षमता थोडी वाढवा ‘अभी खेल बाकी है’”, असा खोचक राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी लगावला.
सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राणे म्हणाले, “मुंबई महापालिकेत महापौर हा हिंदू, मराठी आणि महायुतीचाच होईल. आम्ही हिंदू आहोत ‘उर्दू’ नाही. उबाठाच्या विचारांचा महापौर बसला, तर मुंबईत उर्दू शाळा वाढतील, उर्दू भवन तयार होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या पत्रावर मुंबईत उर्दू भवन सुरू करण्याचे काम सुरू केले होते. मुंबईत उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा, ठाकरेंची सत्ता आली तर ते मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील”.
येत्या १५ दिवसांत मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार
चिपी विमानतळासंदर्भात मंत्री नितेश राणे म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चिपी हे अतिशय महत्त्वाचे विमानतळ आहे. विमानाच्या माध्यमातून पर्यटक येथे यावेत, आर्थिक सक्षमता वाढावी, याच हेतूने खासदार नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची स्थापना केली. या विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. शिवाय मोठी विमाने सुद्धा उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या १५ दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मंत्री राणेंनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी ओरोस येथे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ याबाबत केलेल्या आंदोलनाची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता वेगळे निकष लावावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात साक्षरतेत प्रथम आहे. त्यामुळे यावर आम्ही लवकरच तोडगा काढू”, असे आश्वासन त्यांनी दिले.






