नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे म्हणता यायचे. बहुतेक कुटुंबात साठपासष्ट वर्षांचे आजी-आजोबा, ४०/४५चे आई-वडील, ५ वर्षांपासून २० वर्षांपर्यंतची किमान ५/६ मुले-मुली, एखादी निराधार मावशी, वडिलांची विधवा बहीण असायची. कुटुंबांचे स्वरूप असे ऐसपैस असायचे. घर कसे भरलेले असायचे. दिवसभरात दाराला कडी म्हणून लागायची नाही.


जसजसे औद्योगिक क्रांतीचे बरेवाईट परिणाम आपल्या देशातही दिसू लागले तसतसे हळूहळू माणसापेक्षा पैशाचे महत्त्व वाढत गेले. घरातल्या मुली-सुनांना नोकरी करणे भाग पडू लागले. बाहेरच्या स्पर्धाशील जगात वावरल्याने स्त्रीचा कुटुंबवत्सल, संस्कारक्षम स्वभाव बदलणे तिला भाग पडले. सुरुवातीला हे अनिच्छेने आणि पुढे त्याचे आर्थिक फायदे कळल्यावर आनंदाने सर्वत्र घडत गेले. एक अपरिहार्य परिणाम म्हणून कुटुंबाचे, त्यातील सदस्यांच्या नात्यांचे, शेकडो वर्षे जपलेल्या नैतिक मूल्यांचे, एकंदरच विचार-प्रक्रियेचे स्वरूपही बदलले.


एकमेकाबद्दलची स्वाभाविक कर्तव्यभावना, सामाजिक प्रतिष्ठेचे भान, परस्परांसाठी त्याग करण्याची वृत्ती ही रूढ भारतीय जीवनमूल्ये कालबाह्य मानली जावून त्याजागी उपयुक्ततावाद, भोगवाद, अलीकडे तर चंगळवाद वाढू लागला! वस्तू, घरे, संपत्ती, नाती, भावना, जीवनमूल्ये, एवढेच काय अगदी माणसांचाही विचार फक्त उपयुक्ततेच्या अंगाने, फायदा-तोट्याच्या व्यापारी गणितावर होणे सुरू झाले! हे एकदम झाले असेही नाही! हा बदल जरी व्यापक होता तरी हळूहळू झाला. त्यामुळे कथेतल्या प्रयोगशाळेतील बेडकांप्रमाणे भांड्यातले पाणी हळूहळू तापत गेल्याने कुणालाच या बदलाची भयानकता जाणवली नाही, तीव्रता लक्षात आली नाही! आता चुकून एखाद्याच्या लक्षात आली तरी त्यामुळे तो बदलेल हे शक्य राहिले नाही! समाजाने, जणू सामूहिकपणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा विकारांच्या चक्रव्युहात स्वत:हून चालत जाण्याचा, अभिमन्यूचा एकेरी वाहतुकीचा मार्ग निवडला! आता तर परतीची वाटच नाही!


हिंदी चित्रपटसृष्टीने या बदलाची नोंद घेतली. पूर्वी समाजाला जागे करायचा प्रयत्नही केला होता. राजेश खन्ना, जया भादुरी, हरिन्द्रनाथ चटोपाध्याय, ए. के. हंगल, दुर्गा खोटे, उषा किरण, असरानी, पेंटल यांना घेऊन ऋषिकेश मुखर्जींनी काढलेला ‘बावर्ची’(१९७२) हा असाच एक प्रयोग होता. आपसातले प्रेम कमी झालेले पण त्याची थोडीफार मुळे शिल्लक असलेले कुटुंब बघून राजेश खन्ना त्या घरात स्वयंपाकी म्हणून येतो आणि हळूहळू सर्व गैरसमज दूर करून त्या लोकांचे परस्परांचे संबंध फुलवून, प्रेम जागे करून निघून जातो अशी ‘बावर्ची’ची कथा होती.


असाच १९६३ साली गजानन शिर्के यांनी यशवंत पेठकर यांच्या दिग्दर्शनात काढलेला चित्रपट होता ‘मोलकरीण’! मनोरंजनविश्वाने उच्च जीवनमूल्यांच्या होत असलेल्या ऱ्हासाची जाणीव मराठी समाजाला करून दिल्याचे हे मराठीतले उदाहरण! सुलोचना, रमेश देव, सीमा, इंदिरा चिटणीस यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रभावी ठरलेला ‘मोलकरीण’ खुद्द साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारलेला होता.


असाच सामाजिक संदेश असलेला ‘धाकटी सून’(१९८६) काढला होता अमर तुलसानी आणि शरद वर्तक यांनी. दिग्दर्शन होते एन. एस. वैद्य यांचे. पैशांच्या लोभामुळे दोन भावातील भांडणे, आई-वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागणे, अगदी जवळच्या नात्यांची झालेली वाताहत हा चित्रपटाचा कथाविषय! त्यातून दिग्दर्शकाने मराठी प्रेक्षकाला तो गमावत असलेल्या अमूर्त वैभवाची जाणीव करून दिली होती.


‘धाकटी सून’चे कलाकार एकापेक्षा एक होते - लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर, सविता प्रभुणे, स्मिता तळवलकर, उदय टिकेकर, वसंत शिंदे, लीला गांधी, शोभा शिराळकर आणि शेखर नवरे. उदय टिकेकर आणि सविता प्रभुणे यांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असते, घरच्यांच्या मान्यतेने लग्नही ठरते. नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या उदयच्या वडिलांचे (शरद तळवलकर) फंडाचे पैसे येतात. मोठे घर विकत घेण्यासाठी त्या पैशावर सुनेचा डोळा असतो. वडील आनंदाने पैसे फ्लॅटसाठी मुलाला देतात आणि पुढे त्या दोघांना चक्क वृद्धाश्रमात राहायची वेळ येते. शेक्सपियरच्या अजरामर ‘किंग लियर’ नाटकासारखी किंवा त्यावरच शिरवाडकरांनी बेतलेल्या ‘नटसम्राट’सारखी ही कथा!


मुंबईच्या चाळीत पूर्वी सायंकाळी सगळे चाळकरी जमून गावाकडच्यासारखी भजने म्हणत. ‘धाकटी सून’मध्ये तसेच धोतर कोट-टोपीतले शरद तळवलकर शेजाऱ्यांसोबत बसून भजन म्हणत आहेत असा प्रसंग होता. मुलांत आपल्या म्हातारपणाचा सहारा पाहणारे शरद तळवलकर आनंदाने चाळकऱ्यांच्या आनंदासाठी भजन गाण्यात तल्लीन झालेले दाखवले होते.


सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी गावून संगीत दिलेल्या त्या भजनवजा गाण्याचे शब्द होते -


‘मंदिरात अंतरात तोच नांदताहे,
नाना देही नाना रूपी, तुझा देव आहे.’


भारतीय अध्यात्मातील ‘कणकणमे भगवान’ या ‘पॅनथेईझम’च्या श्रद्धेचा प्रभाव त्याकाळी सर्व समाजावर होता. अशा भजनांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर नकळत उच्च अध्यात्मिक संस्कार होत. आतासारखे ‘शिक्षणाच्या आईचा घो’ टाईप सिनेमा निघत नसत. माझ्यात आणि तुझ्यात वास करणारा देव एकच आहे हे पटल्यावर माणसात कलह, स्पर्धा, द्वेष निर्माण व्हायला वाव राहात नसे. किमान सौहार्द आणि परस्पर प्रेम तर नक्कीच टिकून राहायचे.


‘तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती,
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे.
मंदिरात अंतरात तोच नांदताहे,
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे.’


ईश्वराच्या वेगवेगळ्या कल्पना, प्रत्येकाली भावतील अशा भिन्न प्रतिमातही तो एकच उभा आहे, हा संस्कार सहजगत्या सर्व समाजाच्या मनावर बिंबवला जाई. हे काम इतक्या अलगद व्हायचे की लक्षातही यायचे नाही. उच्च जीवनमूल्ये, एकोपा आणि परस्पर प्रेमाचे महत्त्व प्रत्येकाला सहज पटवले जाई. देवाच्या दर्शनासाठी कठीण कर्मकांड, व्रतवैकल्य करण्यापेक्षा माणसात देव पाहणे महत्त्वाचे हा विचार मनात अलगद सोडला जाई -


‘संतांचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात,
तोच भेटतो भक्ताला, तोच त्याचा नाथ आहे.
मंदिरात अंतरात तोच नांदताहे...’


जुने गीतकार हल्लीसारखे केवळ संगीतकाराने दिलेल्या ठेक्यावर गाणी पाडणारे हलवाई नव्हते. त्यावेळच्या सर्वसाधारण भारतीय माणसाप्रमाणे अध्यात्माची जाण असणारे, स्वतंत्र चिंतन असलेले विचारशील लोक होते.

Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक

संकल्प

जीवनगंध : पूनम राणे गुरुवारचा दिवस होता. नवीन वर्षाचा पहिला दिवस. जिकडे तिकडे उत्साही वातावरण दिसत होते.