Tuesday, January 27, 2026

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९ वर्षांखालील युवा संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा २५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या युवा वन-डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत ५० षटकांत सर्वबाद ३०० धावांचा डोंगर उभा केला. हरवंश पंगालियाने (९३ धावा) आणि आर. एस. अंबरीशने (६५ धावा) केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला हा आव्हानात्मक स्कोअर करता आला. ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही चांगली सुरुवात केली. जोरिच व्हॅन शॉकविक (नाबाद ६० धावा) आणि अरमान मनॅक (४६ धावा) यांनी डाव सावरला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर साहिलने डावाची सकारात्मक सुरुवात केली, मात्र तो ३२ धावांवर बाद झाला. तसेच अभिषेकने उपयुक्त २८ धावांचे योगदान देऊन मधल्या फळीत हरवंशला साथ दिली. मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या हरवंश पंगालियाने ९३ धावांची वादळी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला आर. एस. अंबरीशने ६५ धावांचे मोलाचे योगदान देऊन उत्तम साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून जे. जे. बॅसन आपल्या यशस्वी गोलंदाजीने १० षटकांत ४ बळी टिपले आणि भारतीय धावगतीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय डावाच्या अखेरीस विजांच्या कडकडाटामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला होता, मात्र सुदैवाने षटकांची कपात करण्यात आली नाही. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भारतीय युवा खेळाडूंनी दाखवलेला हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.

आता भारताचे गोलंदाज या धावसंख्येचा बचाव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ या ३०१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील होता. हा सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर असून भारतीय गोलंदाजांना ठराविक अंतराने बळी मिळवावे लागणार आहेत.

Comments
Add Comment