वसई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांचे झपाट्याने होणारे नागरीकरण आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये वाढणाऱ्या बेसुमार गर्दीमुळे गेल्या वर्षभरात मीरा-रोड ते वैतरणा दरम्यान तब्बल १७० प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आकडेवारी रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. मुंबईतील वाढत्या महागाईमुळे अनेकांनी वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात घरे घेण्याला पसंती दिली आहे. यामुळे या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली असून त्याचा थेट भार रेल्वे सेवेवर पडत आहे. विरार, नालासोपारा, वसई, नायगाव आणि मीरा-भाईंदर या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेषतः नालासोपारा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, येथील गर्दी आता नियंत्रणाबाहेर जात आहे.
लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नसल्याने शेकडो प्रवासी दारात लटकून प्रवास करतात. धावत्या लोकलमधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोकल उशिराने आल्यास प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी जीवघेणी ठरते. यामुळे गाडीत चढण्याच्या चढाओढीत अनेक अपघात होतात. घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या नादात अनेक प्रवासी भरधाव एक्स्प्रेस गाड्यांच्या कचाट्यात सापडतात. ही प्रवाशांची निष्काळजीपणाची कृती त्यांच्या जीवावर बेतत आहे.
वाढते बळी पाहता, रेल्वे प्रशासनाने फेऱ्या वाढवाव्यात, पादचारी पुलांची संख्या वाढवावी आणि प्रवाशांनीही रूळ ओलांडण्यासारखे धोके पत्करू नयेत, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून केले जात आहे. पश्चिम रेल्वेवरील हा 'डेथ ट्रॅप' कधी संपणार, असा संतप्त सवाल आता सामान्य प्रवासी विचारत आहेत. दिवसेंदिवस गर्दी इतकी वाढली आहे की, लोकलमध्ये नीट चढता आणि उतरता येत नाही. लोकल फेऱ्या वाढविणे, नियमित वेळेत गाड्या उपलब्ध करून देणे अशा उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
मृत्यूचा आकडा कमी झाल्याचा दावा
रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला आहे. २०२५ या वर्षात मृत्यूचा आकडा ५७ ने घटला असल्याचे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.
प्रवाशांना पोलिसांचे आवाहन
लोकल प्रवासादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी प्रवाशांसाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षक जाळ्या, भुयारी मार्ग अशी व्यवस्था केली आहे; परंतु रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणे, संरक्षक जाळ्यांवर चढून रूळ ओलांडणे, चालती गाडी पकडणे अशा हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत. प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.






