मुंबई : जे उध्दव ठाकरे स्वतः १४ मे २०२० ला बिनविरोध निवडून आले, तेच उध्दव ठाकरे आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत. आधी तुम्ही राजीनामा द्या, मगच बिनविरोध निवडीवर बोला, असा टोला भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आणि मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केले.
मागाठाणे येथील वार्ड क्रमांक तीन चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना मंत्री अशी शेलार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी आमदार प्रविण दरेकर, संजय उपाध्याय माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरत असून आज रविवार मुंबईकरांसाठी प्रचारवार ठरला. भाजपाचे मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभारी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही झंझावाती दौरा करीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
या दौऱ्याची सुरुवात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९४ येथून झाली. येथे महायुतीच्या उमेदवार पल्लवी सरमळकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले, यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
त्या नंतर वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र. १०१ मध्ये महायुतीच्या उमेदवार अनुश्री घोडके यांच्या प्रचारार्थ पदयात्रेदरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले.
वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सविस्तर संवाद साधला. यावेळी वांद्रे पश्चिममधील महायुतीच्या सहाही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रचाराची दिशा, सभांचे नियोजन, बूथनिहाय तयारी आणि जनसंपर्क अधिक प्रभावी कसा करता येईल याबाबत ॲड. आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, बोरिवली पश्चिम विधानसभा क्षेत्रातही मंत्री आशिष शेलार यांनी येथील सर्व उमेदवारांची बैठक घेतली. तर संध्याकाळी ठाणे घोडबंदर रोड परिसरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला.






