शिवसेनेची टीका; मराठीसाठी एक झालेल्या ठाकरेंच्या जाहीरनाम्यात इंग्रजीचाच भडीमार
मुंबई : मराठीसाठी एकत्र आलेल्या उबाठा आणि मनसेने निवडणूक वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला. विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदु, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट शब्द वगळले, या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असल्याची घणाघाती टीका शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली. मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास खळखट्याक करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी करणाऱ्यांना धडा शिकवणार का, असा सवाल शेवाळे यांनी केला.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेवाळे म्हणाले की, स्वत:ला हिंदुह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही, अशी घणाघाती टीका शेवाळे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर आणि सन्मान न करणारा उबाठा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसैनिकाला आणि मराठी माणसाला वेदना देणारा आहे, असे शेवाळे म्हणाले. संपूर्ण वचननाम्यात हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख टाळून उबाठाने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला आहे, असे शेवाळे म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मुंबईत वैद्यकीय महाविद्याल, कोळीवाड्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय़ का नाही घेतले, असा सवाल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला. आजचा वचननामा म्हणजे बालकांना वाचवायचा पालकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली.
मराठी रंगभूमीसाठी दालन, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देणे, स्वातंत्र्याची गाथा देणारं स्मृतीदालन, पूर्व उपनगरात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार, मुंबईच्या २४ तास पाणी पुरवठ्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचे काम, समुद्राचे पाणी गोडं करण्याचा प्रकल्प अशी आश्वासने २०१७ मधील वचननामामध्ये देण्यात आली होती. ठाकरेंनी २०१७ वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपीपेस्ट करुन इंग्रजी भाषेत सादर केले, असा टोला शेवाळे यांनी लगावला. शिवसेना मराठी माणूस, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, आम्ही घाबरत नाही, असे शेवाळे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेकडून पंचवार्षिक कार्यक्रम घोषीत करणार आहोत. यासाठी पुरेसा निधी आणि धोरणात्मक निर्णय़ घेतले जाणार आहेत. मुंबईतील मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी महिलांसाठी अर्थसहाय्य, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांचे पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना कार्यक्रम राबवणार आहे, असे शेवाळे म्हणाले.
ठाकरेंचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा
शेवाळे यांनी ‘हा शब्द ठाकरेंचा’ यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की काँग्रेससोबत जाणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळासाहेबांचा शब्द होता. बाळासाहेबांचा शब्द हा धनुष्यबाणासारखा होता, एकदा सुटला की आरपार जायचा. मात्र ठाकरेंचा शब्द यूटर्न मारणारा असून तो त्यांच्यावरच उलटणार आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली. एकमेकांना विश्वासघातकी म्हणणारे, पाठित खंजीर खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे ते आहेत त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही, असे शेवाळे म्हणाले. त्यांचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा आहे, अशी खरमरीत टीका शेवाळे यांनी केली. त्यामुळेच त्यांनी वचननाम्यातमध्ये जाणीवपूर्वक हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळला.






