मुंबई : उबाठाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक घोषणा करून ज्येष्ठांना बाजुला करून नवीनांना संधी दिली जाईल असे सांगत एकप्रकारे उबाठाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिल असे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. पण प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा युवा सेनेच्या पदाधिकारयांचा विसर पडलेला दिसून आला. युवा सेनेच्या कोअर कमिटीचे अंकित प्रभू, राजोल पाटील, धनश्री कोलगे यांच्यासह शशिकांत झोरे यांच्या सारीका झोरे, रियान मेंडिस यांची पत्नी आणि मयुर कांबळे यांची पत्नी रेखा आदींना वगळता कुठल्याही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उबाठाने संधी दिलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना एकप्रकारे गाजरच दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत उबाठाच्या युवा सेनेचे अंकित प्रभू यांन प्रभाग क्रमांक ५४, राजोल पाटील यांना प्रभाग ११४ आणि धनश्री कोलगे यांना प्रभाग क्रमांक २मधून उमेदवारी देण्यात आली. यातील अंकित हे सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत, तर राजोल या खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या दोघां वडिलांच्या ताकदीवर उमेदवारी मिळाली आहे. तर धनश्री कोलगे यांना प्रभाग क्रमांक २मधून तसेच सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या कुटुंबातील सारीका झोरे यांना प्रभाग क्रमांक १२मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मयुर कांबळे यांची पत्नी रेखा यांना प्रभाग क्रमांक २०१मधून आणि रियान मेंडिस यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे अपवाद वगळता युवा सेनेच्या अन्य कोअर कमिटीच्या सदस्यांसह पदाधिकाऱ्यांची घोर निराशा केली आहे. वरळीतील युवा सेनेचे अभिजित पाटील यांच पत्नी आकर्षिता तसेच संदीप वरखडे हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. तर प्रभाग क्रमांक १९२मधून साईनाथ दुर्गे, प्रभाग क्रमांक २०२मधून पवन जाधव यांच्यासह युवा सेनेच्या शितल देवरुखकर, सुप्रभा फातर्पेकर, प्रथमेश पांडुरंग सकपाळ, जय सरपोतदार, समृध्द शिर्के यांची घोर निराशाच केली आहे. तर काही शाखाप्रमुखांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पत्नीला युवा सेनेचे पदाधिकारी बनवले होते. त्यामुळे यातील काही उमेदवार हे युवा सेनेचे पदाधिकारी दाखवले गेले असले तरी युवा सेनेचे सक्रिय कार्यकर्ते नसून केवळ उमेदवारीसाठी पदधारणा करून दिल्याचे काही उबाठाच्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक ५१मधून उबाठाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटी सदस्य शितल देवरुखकर-शेठ या इच्छुक होत्या. परंतु तिथे दुसऱ्याच उमेदवाराची नाव घोषित केल्यामुळे शितल देवरुखकर यांनी उबाठाला राम राम करत भाजपात प्रवेश केला. शितल देवरुखकर या उबाठाच्या उपनेत्या होत्या आणि फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्यासारख्या पत्ता कापला जाणे हे उबाठा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलेले पहायला मिळत आहे.






