मुंबई : ‘१६ जानेवारी ही तारीख धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्यादिवशी मुंबईत महायुतीचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. १६ तारखेचा विजय हा महाविजय असेल, हा माझा शब्द आहे’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचप्रमाणे मुंबईला देशातील पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी अर्थसंकल्पात १७ हजार कोटींची विशेष तरतूद करण्याचे आश्वासन दिले.
मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी वरळी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, नितेश राणे, यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. डबेवाल्यांच्या वतीने महायुतीला विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण तिथीनुसार माँसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. १४ आणि १५ ही संक्रमणाची तारीख आहे, यावेळी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. १६ तारीख ही धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्यादिवशी या मुंबईत महायुतीचा महापौर बसवायचा आहे. मुंबईकरांनी ही महापालिका आमच्या हातात द्यावी, पारदर्शी, प्रामाणिक कारभार करून आम्ही नवीन मुंबई घडवून दाखवू. आम्हाला केवळ पायाभूत सुविधा बदलायच्या नाहीत, तर मुंबईतील गोरगरीबांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. त्यासाठी मुंबईकरांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत”, असे आवाहन त्यांनी केले.
‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांना थारा नाही
फडणवीस यांनी सांगितले की, आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. आमचा त्या ताकदीला विरोध आहे, जी या हिंदुस्थानात, महाराष्ट्रात वंदे मातरम म्हणायला विरोध करते. या भारतात आमची कोणाशीही दुष्मनी नाही. पण, ज्याची भारताशी दुष्मनी आहे, त्याला आम्ही सोडणार नाही, ही आमची मानसिकता आहे. मुंबईतील सामान्य मराठी माणसाचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. मराठी माणूस हद्दपार कोणामुळे झाला? तुम्ही सांगता मुंबई पालिकेत आम्ही ७० हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या. पण, त्याच्या पावत्या आम्ही चाटायच्या का? ज्यावेळी गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर जात होता, त्यावेळेस ७० हजार कोटीतले २-३ हजार कोटी खर्च केले असते, तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईत हक्काचे घर मिळाले असते, असे फडणवीस म्हणाले.
बुरखेवाली महापौर होणार म्हटल्यावर भोंगे बंद
आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या वचननाम्यावर टीका करताना ते म्हणाले, मुंबईत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यात काही अबोल बालके आहे. मेट्रो, कोस्टल रोड आम्ही केला, असा दावा ते करतात. पण, कोणत्याही मुंबईकराला अर्ध्या रात्रीत उठवून विचारा, ते सांगतील ही सगळी कामे महायुतीने केली. मुंबईचा महापौर कोण होणार, हा देखील मुद्दा आला. पण, मी पुन्हा सांगतो, मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीच होणार, महायुतीचाच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. वारीस पठाण म्हणाले, बुरखेवाली महापौर होणार. त्यावर एकही भोंगा बोलायला तयार नाही. त्यांच्या बॅटरीमधले सेल डाऊन झाले, असा टोलादेखील त्यांनी लगावला.






