अलिबाग (प्रतिनिधी) : सरत्या २०२५ या वर्षात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दमदार कामगिरी केली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच अवैध धंद्यांना दणका देत पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर मोठा अंकुश ठेवला. यात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या कालावधीत खून, दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंग व चोरी अशा ४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. यामध्ये ४६ आरोपींना अटक झाली. या कारवाईत एकूण २ कोटी ८४ लाख २३ हजार ७९५ रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने बेकायदा धंद्यांविरोधातही व्यापक मोहीम राबविली. यामध्ये ४९ गुन्ह्यांची नोंद करून ४१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ७ कोटी ७५ लाख २१ हजार ४८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उकल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या सातत्यपूर्ण व कठोर कारवायांमुळे रायगड जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून, सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुढील काळातही अशीच कडक मोहीम सुरू राहील, असा विश्वासही पोलिस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. आंचल दलाल यांनी रायगड पोलीस अधिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रायगड पोलीस दल अधिक कार्यक्षम करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे त्यांनी मिलिंद खोपडे यांच्याकडे दिली. त्यानंतर अनेक महत्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दल यशस्वी ठरले. यामध्ये देशभरात बंदी असतानाही सुरू असलेला ऑनलाईन मटक्याचा शोध लावून स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांच्या कामगिरीत मानाचा तुरा खोवला आहे.
२०२५ मध्ये ३२ खुनाचे गुन्हे नोंद झाले होते. पैकी ३२ गुन्हे उघड करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून, त्याचे प्रमाण ९४ टक्के असून, सन २०२४ च्या तुलनेत समप्रमाणात हे गुन्हे आहेत. खुनाच्या प्रयत्नाखाली २७ गुन्हे दाखल झाले होते. पैकी सर्वच्या सर्व २७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याचे प्रमाण १०० टक्के आहे. सन २०२४ च्या तुलनेत समप्रमाणात आहे. दरोड्याखाली तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व तीनही उघड करण्यात पोलिसांना यश आले. सन २०२४ च्या तुलनेत दोन गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. जबरी चोरीखाली २८ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पैकी २४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, उकल करण्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. सन २०२४ च्या तुलनेत चार गुन्ह्यांची घट झाली आहे. घरफोडीखाली १४३ गुन्हे दाखल झाले होते. पैकी ९५ टक्के गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. सन २०२४ च्या तुलनेत चार गुन्ह्यांची घट झाली आहे. चोरी याखाली २७१ गुन्हे दाखल झाले आहेत. पैकी १७३ गुन्हे उघड झाले झाले असून, त्याचे प्रमाणे ६४ टक्के आहे. सन २०२४ च्या तुलनेत ९४ गुन्ह्यांची घट झाले आहे.
दंगलखाली १३२ गुन्हे दाखल झाले असून, पैकी सर्वच्यासर्व १३२ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०२४ च्या तुलनेत १८ गुन्हे वाढले आहेत. दुखापतीखाली ३३१ गुन्हे दाखल झाले असून, पैकी सर्वच्या सर्व ३३१ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्याचे प्रमाण शंभर टक्के असून, २०२४ तुलनेत ४४ गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. बलात्काराखाली १३६ गुन्हे दाखल झाले असून, पैकी सर्वच्या सर्व १३६ गुन्हे उघड केले असून यामध्ये पोक्सो अंतर्गत ११५ गुन्हे आहेत. यामध्ये शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, २०२४ च्या तुलनेत यामध्ये २८ गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेस निवासी पोलिस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे, प्रोबेशनल पोलिस अधिकारी सुयश सिंह उपस्थित होते.






