नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
आपली प्रिय माणसे कायम ‘आपल्यासाठी’ असावीत असे आपल्याला वाटत असते. पण...
‘एकेक पान गळावया झाडाशी नाते तोडावया, भूवरती झाली पडावया जणु जन्मासी येते
माझी आई, दादा, नाना, निरू, अक्का सारे जग सोडून निघून गेले. बाबा तर मी केवळ १९ वर्षांची असताना आम्हांला पोरकं करून गेले. आई केवळ ४२ वर्षांची होती. मग दादाच माझा बाप झाला. कोणी विचारले की, “बाबा काय करतात? तर सांगायचे की बाबा जेलर आहेत. रडायचे अजिबात नाही.” दादा जेलर होता. अवघा २३ वर्षांचा पण माझा बाबा झाला. इतकी माया आयुष्यभर दिली की पुरून उरावी, जन्मभर जपावी. ...आणि आता मित्रपरिवार उठून जाऊ लागला.
डॉ. स्नेहलता देशमुख यांची मी दूरदर्शनवर मुलाखत घेतली होती. दूरदर्शनवर मी तेव्हा नियमित मुलाखती घेत असे. टीव्हीवरून फोन आला की, “स्नेहलताबाई मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्त झाल्या आहेत. आणि सगळ्यात पहिली मुलाखत मुंबई दूरदर्शनवर व्हायला हवी. तुम्ही त्वरित सायन हॉस्पिटल गाठा आणि बाईना घेऊनच या.”
मी त्वरा केली. जल्दीने सायन हॉस्पिटल गाठले नि डॉक्टरीण बाईंचे अभिनंदन केले. “मॅडम, पहिली मुलाखत तुमची दूरदर्शनवर घ्यायचा मान मिळू दे.” “चला, मी तयार आहे. सायन हॉस्पिटलचा चार्ज एका जबाबदार डॉक्टरकडे देते. मला थोडा अवधी द्या.” डॉक्टरीण बाईंनी सर्व व्यवस्था वीस मिनिटांत केली आणि मजबरोबर निघाल्या. स्वस्थचित आणि आनंदी वृत्तीने! “बाई, कुलगुरू पदाचा भार म्हणजे इतकी सारी महाविद्यालये, त्यांचे मनमानी प्राध्यापक, इतकी वाढली विद्यार्थी संख्या यांचा भार नाही वाटत?” “विजूताई, मला कामाची भीती वाटत नाही. नवे नवे दालन ईश्वराने मजसाठी उघडले आहे. नव्या पानावर सुवाच्च अक्षरात लिहिण्याची ताकद आणि हौस माझ्यात जबरदस्त आहे.” त्या हसून म्हणाल्या. अगदी मोकळा होता त्यांचा स्वर. मी आपली कौतुकाने बाईंकडे बघत होते. डॉक्टरीण बाई नव्या कार्यभाराने जराही विचलित झाल्या नव्हत्या. “कोकणात म्हणावा तसा महाविद्यालयाचा विकास झालेला नाही. मला कोकणाकडे विशेष लक्ष द्यायचे आहे.” बाई बोलत होत्या. बाईचे यजमान, डॉ. शामराव देशमुख, पत्नीच्या यशाने गहिवरले होते. केवढे मोठे मन. पत्नीच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारा पती विरळाच बघायला मिळतो. बाई त्याबाबतीत अतिशय भाग्यवान होत्या.कुलगुरू पदावर विराजमान झाल्यावर बाईंनी कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले. १) सर्टिफिकेट मराठीत असावे. मराठीचा महाराष्ट्रात मान राखला जावा. २) प्रमाणपत्रावर आईचेही नाव असावे. हा निर्णय तर क्रांतिकारी होता. “आईने जन्म द्यावा, मुलाला, मुलीला. निगुतीने वाढवावे. नाव मात्र बाबांचे लावावे! आई कुठेच नाही? हे कसे जन्मदात्रीचे ऋण विसरून जाण्याइतकेच नाही का?” बाईनी प्रश्न केला. सिनेट मेंबर्स मूक झाले. आपली ‘बाबा वाक्यम् प्रमाणम् संस्कृती’ ना! आई म्हणजे घर सांभाळणारी स्त्री। पण आता कुलगुरू एक अत्यंत बुद्धिमती स्त्री होती. ती स्वतः अत्युच्च शिक्षण घेतलेली अन् प्रथम क्रमांकाने, सर्व स्त्री-पुरुष डॉक्टरांत पहिली आलेली स्त्री होती. डॉ. अलेक्झांडर यांनी आपल्या पत्नीचेही मत घेतले. “काय वाटते अकम्मा? आपला विचार काय?” “हे आधीच घडायला हवे होते.” अकम्मा म्हणाल्या. राज्यपाल साहेब मग सरळ त्या पत्रावर सही करते झाले आणि स्नेहलताबाई मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झाल्या. सर्वचैव बुद्धिमती अन् कार्यकुशल. बाईचे संस्कृत, मराठी, इंग्रजी सर्व भाषांवर प्रभुत्व होते. बोलणे मृदू, स्वच्छ विचारांचा प्रभाव, निर्णयक्षमता पक्की. काही काही कमी नव्हतेच. बाईची उंची कमी होती. पण आईने सांगितले, “लता, तुझ्या बुद्धीचा प्रभाव इतका असू दे की उंचीचा प्रश्नच उद्भवणार नाही. धन्य ती माता. जीवनावर आईचा प्रभाव. विमलची मुलगी महाराष्ट्राचे वैभव ठरली.






