ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे. यांचा उल्लेख रामायण व महाभारतातही येतो. अत्यंत विद्वान व तपस्वी म्हणून हे प्रसिद्ध आहेत. यांच्या अंगावर भरपूर केस (लोम) असल्याने त्यांना लोमश ऋषी असे म्हटले जात असल्याचाही उल्लेख आहे. ते शिवाचे निस्सीम भक्त होते. पुरणातील उल्लेखानुसार लोमश ऋषींना लहानपणापासूनच मृत्यूचे खूप भय वाटत होते. त्यामुळे त्यांनी शंभर वर्षं कमलपुष्पाच्या साहाय्याने महादेवाची आराधना व तप केले. तेव्हा महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले असता, त्यांनी अमरत्वाचा वर मागीतला. मात्र अमरत्वाचा वर शक्य नसल्याने महादेवाने त्यांना अन्य वर मागण्यास सांगितले. तेव्हा लोमश ऋषींनी एका कल्पात माझा एक केस गळावा व असे सर्व केस गळाल्यानंतर मला मृत्यू यावा असा वर मागीतला. शिवाने हसून तथास्तू म्हणून त्यांना वर दिला. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी चार युगे पार पडल्यानंतर एक चतुर्युग होते. असे ७२ चतुर्युग झाल्यावर एक मन्वंतर होते व अशी १४ मन्वंतरे झाल्यानंतर एक कल्प होतो व एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो व ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षांचे असते असे कालमापन पुराणात आहे.


लोमश ऋषी नित्यनेमाने भागवत कथा सांगत असतात. एकदा कथा सांगत असताना एक व्यक्ती कथेमध्ये त्यांना वारंवार प्रश्न विचारत होता. तेव्हा चिडून त्यांनी त्या व्यक्तीला मधे-मधे कावळ्यासारखे काय काव काव करतो, मागल्या जन्मी कावळा होता का? पुढच्या जन्मीही कावळा होशील! असा शाप दिला. शाप ऐकून ती व्यक्ती शांतच होती व त्याने नम्रपणे त्याचा स्वीकार केला. हे पाहून लोमश ऋषींना अत्यंत खेद झाला. तेव्हा त्यांनी त्याला तू पुढच्या जन्मी जरी कावळा झाला तरी राम कथा सांगशील असा उ:षाप दिला. तोच पुढे काकभुशुण्डी म्हणून प्रसिद्ध झाला व सतत रामकथा कथन करू लागला. त्यानेच गरुडाला राम कथा सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे.


आपण महादेवाला फसवून मागितलेल्या या वराबद्दल लोमेश ऋषी दशरथपाशी बोलताना खंत व्यक्त करतात असा उल्लेख रामचरित मानसमध्ये आहे. आपल्या शरीरावरील एक केस एका कल्पानंतर झडतो व असे सर्व केस झडल्यानंतर मला मृत्यू येईल व आता केवळ एका पायाच्याच गुडघ्याखालील अत्यल्प केस गळाल्याचा उल्लेख व कोणी मला मृत्यू देत असल्यास त्यास मी माझे पूर्ण आयुष्य देतो अशी भावना दशरथाशी बोलताना ते व्यक्त करतात. लोमश ऋषी नेहमी तीर्थयात्रा करीत असत. त्यांनी पांडवासोबतही तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेदरम्यान युधिष्ठिरला उपदेश करून ज्ञान दिले. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रिवालसर ही त्यांची तपोभूमी मानली जाते. तिथे त्यांचे मंदिरही आहे. दरवर्षी वैशाख व मकरसंक्रांतीला या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. येथील सरोवरात स्नान करून दान-धर्म करणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होऊन त्यास वैकुंठप्राप्ती होते, तसेच त्याचे पितरांचाही उद्धार होतो, असा समज आहे. बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील बारबर पहाडात लोमश ऋषी गुफा म्हणून एक गुफा आहे. ती मानवनिर्मित असून सम्राट अशोकाच्या कार्यकाळातच निर्माण केल्याचे सांगितले जाते. लोमश ऋषींनी लिहिलेल्या लोमेश संहिता नामक ग्रंथातून ज्योतिष्य, आयुर्वेद भक्ती आदींचा बोध मिळतो.

Comments
Add Comment

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक

संकल्प

जीवनगंध : पूनम राणे गुरुवारचा दिवस होता. नवीन वर्षाचा पहिला दिवस. जिकडे तिकडे उत्साही वातावरण दिसत होते.