Monday, January 5, 2026

भारतात केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार

भारतात केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार

मुंबई : भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसारख्या लोकप्रिय ब्रँड चालवणाऱ्या सॅफायर फूड्स आणि देवयानी इंटरनॅशनल या दोन प्रमुख कंपन्याचे विलीनीकरण होणार आहेत. विलीन झाल्यानंतर कंपनीचे ३ हजार हून अधिक आउटलेट असतील. नुकतेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही कंपन्यांनी या निर्णयाला मान्यता दिली. नवीन कंपनीची एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे ₹ ८ हजार कोटी असेल. हे विलीनीकरण अशा वेळी झाले आहे जेव्हा भारतातील फास्ट-फूड क्षेत्र मंदावत आहे आणि मागणीत फारशी वाढ दिसून येत नाही.

या विलीनीकरणानंतर, नवीन कंपनीचे कामकाज भारताबाहेर नायजेरिया, नेपाळ, थायलंड आणि श्रीलंकेपर्यंत विस्तारेल. केएफसी, पिझ्झा हट आणि टाको बेल व्यतिरिक्त, कंपनीकडे कोस्टा कॉफी, टी लाईव्ह, न्यू यॉर्क फ्राईज आणि सनूक किचनसारख्या जागतिक ब्रँडसाठी परवाने देखील असतील. या हालचालीमुळे भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसाठी एकच प्रमुख फ्रँचायझी तयार होईल.

विलीनीकरणाच्या अटींनुसार, गुंतवणूकदारांना सॅफायर फूड्सच्या प्रत्येक १०० शेअर्ससाठी देवयानी इंटरनॅशनलचे १७७ शेअर्स मिळतील. देवयानी इंटरनॅशनलची एक समूह कंपनी सॅफायर प्रवर्तकांकडे असलेल्या २५.३५% हिस्सेदारीपैकी १८.५% हिस्सेदारी खरेदी करेल आणि उर्वरित हिस्सेदारी शेअर्समध्ये बदलली जाईल. अमेरिकेतील यम! ब्रँड्सने विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. सरकारी आणि कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी १२ ते १५ महिने लागू शकतात. त्यानंतरच विलीनीकरण पूर्णपणे प्रभावी होईल.

सध्या, जुबिलंट फूडवर्क्स ही भारतातील सर्वात मोठी फास्ट-फूड ऑपरेटर आहे, ज्याचे सहा देशांमध्ये ३,४८० स्टोअर्स आहेत. देवयानी इंटरनॅशनल या विलीनीकरणाद्वारे जुबिलंटला कठीण स्पर्धा देण्याची आणि नफा वाढवण्याची तयारी करत आहे. देवयानीचे अध्यक्ष रवी जयपुरिया म्हणाले की, या विलीनीकरणामुळे कंपनीचा खर्च कमी होईल, तंत्रज्ञान सुधारेल आणि पुरवठा साखळी मजबूत होईल, ज्यामुळे भागधारक आणि ग्राहकांना फायदा होईल. केएफसी, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि टाको बेल सारखे जागतिक ब्रँड एकाच छताखाली एकत्र येतील, ज्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी या सर्व उत्पादनांचा आनंद घेता येईल.

Comments
Add Comment