Monday, January 5, 2026

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना प्राधान्य दिले जात असले तरीसुद्धा संघ ही काही निमलष्करी संघटना नाही. भाजपकडे पाहून संघाचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे हीदेखील एक मोठी चूक ठरेल,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.

‘रा.स्व.संघ हा समाजाचे संघटन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असून त्यामध्ये काही निश्चित मूल्ये आणि विचार यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. भारत पुन्हा परकीय शक्तीच्या तावडीमध्ये सापडू नये असे आम्हाला वाटते,’ असे प्रतिपादनही भागवत यांनी केले. भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. ‘आम्ही एक गणवेश घालतो, संचलन करतो आणि काठ्या हाती घेऊन कसरतीही करतो. पण केवळ त्यावरून जर कुणी आम्हाला निमलष्करी संघटना समजत असेल तर ती मोठी चूक ठरेल.’

संघ समजून घेणे ही कठीण गोष्ट असून ती एक सर्वसमावेशक संघटना आहे. संघाच्या विरोधात चुकीचा प्रचार करण्यात येतो. हल्ली लोक योग्य माहिती गोळा करण्यासाठी मुळापर्यंत जातच नाहीत. ते विकीपीडियावर त्याचा शोध घेऊ लागतात. तिथे सगळीच माहिती बरोबर नसते, असे भागवत यांनी यावेळी सांगितले.

संघ बाहेरील देणग्यांवर अवलंबून नाही : ‘संघाची आर्थिक स्थिती आता कोठे बरी आहे. आमचे संघटन हे बाहेरून येणारा निधी व देणग्यांवर अवलंबून नाही. मागील शंभर वर्षांच्या काळामध्ये आम्हाला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतर प्रखर विरोध, हल्ले सहन करावे लागले. अनेक स्वयंसेवक त्यात मृत्युमुखी पडले. आम्हाला दडपण्याचे प्रयत्न हे आतापर्यंत सुरू होते पण ते सगळे निष्फळ ठरले,’ असे भागवत यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा