मुंबई : वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९५मधून उबाठाने हरी शास्त्री हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परंतु हरी शास्त्रीला उमेदवारी देण्यात आल्याने माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर हे नाराज होत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. हरी शास्त्री यांना युवा सुनेचे सरचिटणीस आणि आमदार वरुण सरदेसाई यांचा आशिर्वाद आहे, तर वायंगणकर यांना उबाठाचे नेते अनिल परब यांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे या दोघांच्या चढाओढीत नक्की कुणाचा आशिर्वाद योग्य ठरतो आणि कुणाचा मारक ठरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९५मधून भाजपचे सुहास आडिवरेकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्यासमोर उबाठाचे हरि शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. हरि शास्त्री यांना उमेदवारी देत आपला पत्ता कापल्याने माजी नगरसेवक आणि अनिल परब यांचे खंदे समर्थक असलेल्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत वायंगणकर यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे वांयगणकर आणि हरि शास्त्री यांच्या जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. हरि शास्त्री हे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई असून युवा सेना सरचिटणीस आणि वांद्रे पूर्व विधानसभेचे उबाठा आमदार वरुण सरदेसाई यांचे समर्थक आहेत.तसेच विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सरदेसाई यांनी माजी नगरसेवक वायंगणकर यांचा पत्ता कापून हरि शास्त्री यांना उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये तू तू मै मै झाल्याचेही वृत्त आहे. हरि शास्त्रीचा पराभव करत वरूण सरदेसाई यांचे महत्त्व कमी करण्याचा परब यांचा प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वरुण सरदेसाई यांचा हा हस्तक्षेप परब यांना सहन झालेला नाही. अशाचप्रकारे आपला पत्ता कापला जाईल याची भीती उबाठाचे दिनेश कुबल यांना आल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथील शाखाप्रमुखाला आपली ताकद दिली. त्यामुळे हरी शास्त्री यांना निवडणून आणण्यासाठी वरुण सरदेसाई आणि वायंगणकर यांना निवडून आणण्यासाठी अनिल परब यांच प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. वायंगणकर यांनी माध्यमांशी बोलतांना, मी जिंकल्यानंतर विजयाचा गुलाल घेवून मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वायंगणकर यांच्या विजयासाठी परब हे अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत असून विभागातील नागरिकांमध्येही तशाप्रकारची चर्चा आहे.






