विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक 


“इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…”
हे वाक्य आपण किती सहज ऐकतो!
आजारपण, अपघात, अनिश्चितता—या सगळ्यांपासून आर्थिक संरक्षण देण्याचे आश्वासन देणारी इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे आपल्यासाठी एक मानसिक आधार असतो. पण जेव्हा प्रत्यक्ष गरज पडते, तेव्हा हाच आधार वाळूचा किल्ला ठरतो, हे माझ्या अनुभवातून कटू सत्य म्हणून समोर आले.
मी आणि माझ्या मिस्टरांनी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेतली. गेली चार वर्षे नियमितपणे प्रीमियम भरत आहोत. पॉलिसी दहा लाखांची आहे. या चार वर्षांत एकदाही मेडिक्लेम केला नाही.
दरवर्षी कंपनीकडूनच माझे ब्लड टेस्ट, बीपी चेकअप केले गेले. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. म्हणजे कंपनीला माझ्या आरोग्याची पूर्ण माहिती होती.
या वर्षी मात्र माझ्या डोळ्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन झाले. साधा, सर्वसामान्य, वयोमानानुसार होणारा आजार.
खर्च आला ₹६०,०००/-.
मी पूर्ण कागदपत्रांसह, रीतसर मेडिक्लेम केला.
पण… क्लेम रिजेक्ट करण्यात आला.
कारण काय तर म्हणे,
“तुम्हाला दहा वर्षांपासून बीपीचा त्रास आहे आणि तुम्ही तो पॉलिसी घेताना लपवला.”
हा आरोप ऐकून मला धक्का बसला.
चौकशी केली असता कळले की डॉक्टरांनी दिलेल्या बिलात चुकून ‘१० वर्षांपासून बीपी’ असे लिहिले गेले होते.
डॉक्टरांनी ती चूक मान्य करून दुरुस्तीचे प्रमाणपत्र दिले – माझा बीपीचा त्रास हा दोन वर्षांपासून सुरू झाला होता आणि हे माझे चेक अप करणाऱ्याना माहीत होते.
इतकेच नाही तर, इन्शुरन्स कंपनी स्वतः दरवर्षी माझा बीपी तपासत होती.
रिपोर्ट्स नॉर्मल येत होते.
त्यांना माहीत होते की हा त्रास अलीकडचा आहे.
तरीही… माझा क्लेम नाकारण्यात आला आणि इतकेच नाही तर आमची पॉलिसी सरळ रद्द केली आणि हद्द म्हणजे आम्हाला त्यांचे मेसेजेस येऊ लागले की तुमची पॉलिसी आता रद्द झाली आहे, तर आपण पुन्हा नवीन पॉलिसी काढा! हा तर निर्लज्जपणाचा कळसच झाला. मला तर वाटते जास्तीत जास्त क्लेम नाकारण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो आणि त्याच्यावर त्यांचे कमिशन अवलंबून असावे.
इथे प्रश्न पैशांचा नाही.
इथे प्रश्न आहे न्यायाचा, प्रामाणिकपणाचा आणि विश्वासाचा.
चार वर्षे प्रीमियम भरताना कधी फोन आला नाही की,
“मॅडम, तुमचा बीपी आहे म्हणून आम्ही पॉलिसी बंद करतो.”
पैसे घेताना सगळं चालतं, एजंट अगदी मागे लागतात पालिसी घ्या, खूप चांगली आहे वगैरे पण गरज पडली की अक्षरांचा, शब्दांचा, तांत्रिक कारणांचा खेळ सुरू होतो.
कॅटरॅक्ट ऑपरेशनचा आणि बीपीचा थेट काय संबंध?
हा प्रश्न कुणी विचारणार नाही का?
इन्शुरन्स म्हणजे आज सेफ्टी नेट नाही, तर सापळा वाटू लागला आहे.
सामान्य माणूस आजारी असताना आधी वेदना सहन करतो, नंतर आर्थिक ताण, आणि शेवटी अशा कंपन्यांकडून मिळणारी मानसिक छळवणूक. आज माझा अनुभव आहे, उद्या तुमचा असू शकतो.
म्हणूनच हा लेख.
कोणाला बदनाम करण्यासाठी नाही, तर लोकांना सावध करण्यासाठी.
इन्शुरन्स घेताना फक्त जाहिराती पाहू नका.
“क्लेम सेटलमेंट रेशो” वाचा.
सूक्ष्म अटी (fine print) नीट समजून घ्या.
आणि गरज पडल्यास आवाज उठवा. कारण आपले आरोग्य ही कोणाची कमाईची संधी नसावी. आज मला फसवले गेले असे मला ठामपणे वाटते.
आणि हे सत्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अनुभव शेअर करा… कारण उद्या कुणाचा तरी त्रास वाचू शकतो.

Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक

संकल्प

जीवनगंध : पूनम राणे गुरुवारचा दिवस होता. नवीन वर्षाचा पहिला दिवस. जिकडे तिकडे उत्साही वातावरण दिसत होते.