Monday, January 5, 2026

मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ उबाठातून भाजपमध्ये

मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ उबाठातून भाजपमध्ये

मुंबई : उद्धव आणि राज यांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. पण आजच्या दिवशी उबाठाला मोठा धक्का बसला. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला. शुभा राऊळ यांनी उबाठा सोडल्यानंतर काही तासांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकरांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. शेलार, दरेकर आणि राऊळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचे वृत्त येताच माजी महापौर शुभा राऊळ भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी राजकीय वर्तुळात पसरली. अखेर या वृत्तावर रविवारी संध्याकाळी शिक्कामोर्तब झाले. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राऊळ यांचे पक्षात स्वागत केले.

वरळीच्या प्रचारसभेत उपस्थित होत्या शुभा राऊळ

वरळी विधानसभा मतदारसंघात महायुतीने शनिवारी संध्याकाळी मुंबईतल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेला शुभा राऊळ उपस्थित होत्या. फडणवीसांचे भाषण राऊळ यांनी लक्षपूर्वक ऐकले होते. यानंतर राऊळ यांनी उबाठाचा राजीनामा देण्याचा निर्णय अंतिम केला. उबाठा सोडल्यानंतर काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोण आहेत शुभा राऊळ ?

शुभा राऊळ या २००७ ते २००९ या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या. त्या उबाठाच्या महिला नेत्या पण होत्या. दहिसरमधून अनेक टर्म नगरसेविका झालेल्या शुभा राऊळ यांनी महापौर असताना हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. उबाठातील विनोद घोसाळकरांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शुभा राऊळ यांनी २०१४ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. पण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी घरवापसी केली होती. एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केल्यानंतरही शुभा राऊळ उद्धव ठाकरेंसोबतच होत्या. पण मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काही दिवसांनी शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >