Sunday, January 4, 2026

मित्र नको, बाबाच बना!

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला आवडतं म्हणावं असं वाटत नाही. पण मुलं जसजशी मोठी होतात तसतसा त्यांच्यातील बदल आपल्याला स्पष्ट जाणवायला लागतो. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारा, जराशा आवाजाने भिऊन आपल्याला बिलगणारा, महागड्या वस्तू हव्याच म्हणून हक्काने मागणारा आपला मुलगा अचानक इतका कसा बदलला हे काही समजत नाही, मात्र हे जाणून घेणं आवश्यक आहे की मुलगा पहिली तीन वर्षे आईच्या भोवती-

भोवती करत असतो. हळूहळू मित्रांशी खेळण्यात व्यस्त राहतो आणि बऱ्याच बाबतीत तो आपल्या बाबांच्या बोलण्या-चालण्याचं, सवयींचं अनुकरण करत असतो. असं म्हणतात मुलं आईच्या कडेवर बसून सभोवतालच्या गोष्टी पाहतात, पण बाबाच्या खांद्यावर बसून संपूर्ण जग बघतात... माया आपुलकी, जिव्हाळा सांगत असतो आईचा पदर आणि बाबांच्या खांद्यावरून जगाकडे पाहताना असते जबाबदारी, कर्तृत्व, कणखरपण, संयम, धाडस यांचे शिखर.

हाच मुलगा जेव्हा बाबांचे बूट घालण्याचा प्रयत्न करतो, चोरून मोटरसायकलवर चक्कर मारून येतो, मित्रांना ट्रीट द्यायची म्हणून पॉकेटमनी मागतो, केसांची स्टाईल बदलायला लागतो, मुलींना आवडावं म्हणून फॅशनेबल कपडे घालतो, गाडी रेस करून त्या आवाजाने लोकांचे लक्ष वेधून घेतो, मुलींच्या आणि आईच्या बाबतीत खूप केअरिंग होतो, छोट्या भावा-बहिणीच्या बाबतीत जास्तच पझेसिव्ह आणि कंट्रोलिंग होतो आणि मग आपल्यालाही जाणवायला लागते की मुलगा आता वयात आलाय. मोठा झालाय. त्याची ती वाढणारी उंची, रुबाबदार चालणं, आवाजातलं घोगरेपणा,

खर्जातील बोलणं, ओठांवर येऊ पाहणारी मिसरूड... सारा फरक डोळ्यांना दिसू लागतो. मुलाला मोठे होताना पाहून आनंद वाटतो तशी जबाबदारीही जाणवते. काळजीही वाटायला लागते. आतापर्यंत आपल्या शब्दांत आणि धाकात असणारे मूल आता बंध तोडून मुक्त होताना पाहताना आनंद आणि अनामिक भीतीही मनाला वाटते.

पण अलीकडे काही सांगायचा प्रयत्न केला, तर त्याचा चेहरा त्रासिक होतो. कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसतात. तो एक तर गप्पच बसतो, नाही तर तिथून निघून जातो. घरातल्यांशी फटकून वागतो. कुठे जातो आहेस? कधी येणार? काय चाललंय? हे सारे प्रश्न म्हणजे त्याला जासुसी वाटते. या नसत्या चौकशा वाटतात. आपल्यावर अविश्वास दाखवला जातो हा अपमान वाटतो त्याला. त्याच्या इगोला धक्का बसतो. अजिबात आवडत नाही हे सारं त्याला. अचानक असा का वागायला लागलाय हा? जबाबदारी नाही, वागण्या-बोलण्याची पद्धत नाही, अभ्यासावरून लक्ष उडाले आहे, मित्रमंडळींच्या ग्रुपचा इन्फ्लुएन्स इतका जबरदस्त वाढला आहे की त्यांनी सांगितलेलं पटतं. तुलनेत मी त्यांना हुकूमशहा वाटतो.

पालकांनो या वयात मुलं स्वतंत्र होऊ लागतात. टीनएजमध्ये पाऊल टाकल्यानंतर कदाचित तुमच्याविषयी त्यांना वाटणारे प्रेम दाखवण्याची पद्धत आता पूर्वीसारखी, ते लहान असतानाची राहिलेली नाही. आपण या वयात मुलांशी मैत्री करण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. मुलांना कंफर्टेबल वाटावं असं आपल्याला वाटतं, पण त्यांना मात्र आपली त्यांच्याशी होणारी जवळीक आवडत नाही, संकोच वाटतो. असं असलं तरी मुलांना पालकांकडून मार्गदर्शन नक्कीच हवं असतं. पण पालक आणि मित्र यात फरक आहे. अशा अनेक गोष्टी असतात की ज्यात कधी पालक, तर कधी मित्र या भूमिका एकमेकांवर कुरघोडी करत असतात. पण काही वेळेस मित्र बनण्यापेक्षा पालक बनणे आवश्यक असते. टीनएजमधील मुलांशी संवाद करायला गेलो की मतभेद होतात, दुरावा वाढायला लागतो. असे आज जरी होत असलं तरी एक दिवस मुलाला हे कळेल की तुम्ही नेहमीच त्याच्या बाजूने होतात. त्याच्या वागण्याला तुमचा विरोध नसतो, तर ती असते तुम्हाला त्यांच्याविषयी वाटणारी काळजी. तुम्ही कन्सर्न असता. त्याला समजेल की त्याला निराश करताना तुमचं मन किती दुखावलं गेलं होतं. ते सोपं नव्हतं अजिबात तुमच्यासाठी. जे तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध करत होता. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावायला तयार होता. पण आज तुम्हाला त्याचा मित्र नाही, तर बाबाच व्हायला हवे.

या वयात टीनएजर मुलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलाच्या प्रक्रियेमुळे, अभ्यासाच्या प्रेशरमुळे, तुमच्या अपेक्षांमुळे, पिअर प्रेशरमुळे, सोशल मीडियावरच्या मित्र-मैत्रिणींच्या पोस्टमुळे मुले अस्वस्थ होतात, भरकटू लागतात. तुमची शिस्त आणि अपेक्षा, बंधन आणि त्यांना हवं असतं स्वातंत्र्य, प्रायव्हसी. या दोन्हींचा मेळ घालताना त्यांची आणि तुमची दोघांची दमछाक होते. तुम्ही कमावते असता. मुलं तुमच्यावर अवलंबून असतात, त्यामुळे मुलांची चिडचिड वाढत जाते. मुलंही वयात येतात पण आपल्या मनातल्या इच्छा, शारीरिक गरजांचं, भावनिक आंदोलनांचं काय करावे हेच मुलांना कळत नाही. मुलगी वयात येते तेव्हा आई तिला सारं समजावून सांगते, पण मुलगा वयात आल्यावर त्याच्या शंकांचे निरसन त्याने कोणाकडून करून घ्यावं याचा विचार बाबा पालकांनी खरंच करायला हवा. अशा शारीरिक- मानसिक भावनिक पातळीवर झुंज देणाऱ्या टीनेजर मुलांशी वागावं तरी कसं हे पाहू यापुढील लेखात.

Comments
Add Comment