मुंबई (प्रतिनिधी) : नव्या वर्षाच्या मुहूर्तावर भारतीय जीवन विमा निगमने आपल्या कोट्यवधी पॉलिसीधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जर तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने २ महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे.
एलआयसीचे हे विशेष अभियान १ जानेवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत चालवले जाईल. या मोहिमेत सर्व 'नॉन-लिंक्ड' पॉलिसींचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, पुन्हा सुरू करण्यायोग्य सर्व 'नॉन-लिंक्ड' योजनांच्या विलंब शुल्कात ३०% पर्यंत सूट दिली जाणार आहे. ही सूट जास्तीत जास्त ५ हजार रुपयेपर्यंत मर्यादित असेल. विशेष म्हणजे, मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीधारकांना विलंब शुल्कात १००% सूट देऊन त्यांना पूर्ण दिलासा देण्यात आला आहे.
नियम आणि अटी
ज्या पॉलिसींचा प्रीमियम भरण्याचा कालावधी संपलेला नाही आणि ज्या पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी बंद झाल्या आहेत, त्या या मोहिमेअंतर्गत पुन्हा सुरू करता येतील. मात्र, वैद्यकीय किंवा आरोग्याशी संबंधित चाचण्यांच्या नियमांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीमुळे जे ग्राहक वेळेवर हप्ते भरू शकले नाहीत, त्यांना आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण पुन्हा सुनिश्चित करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
दोन नवीन योजनांचे लाँचिंग
एलआयसीने डिसेंबर महिन्यात 'प्रोटेक्शन प्लस' आणि 'विमा कवच' नावाचे दोन नवीन प्लॅन देखील बाजारात आणले आहेत. प्रोटेक्शन प्लस : हा एक मार्केट लिंक्ड सेव्हिंग्स प्लॅन असून यात गुंतवणुकीसोबतच सुरक्षेचा फायदा मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळी भरलेले 'मोर्टालिटी चार्जेस' परत मिळणे हे या प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. विमा कवच : लग्न किंवा अपत्याचा जन्म यांसारख्या प्रसंगी विमा रक्कम वाढवण्याची सोय यात आहे. महिला आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसाठी या प्लॅनचे प्रीमियम दर कमी ठेवण्यात आले आहेत.






