मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांना अंगावर घेणारा जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याने भाजपत प्रवेश केला आहे. शुक्रवारी रात्री मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक १२४ मधून देशमुख आपल्या पत्नीच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आव्हाडांकरवी लॉबिंग देखील केले होते. मात्र, उबाठा-मनसे आणि शरद पवार गटाच्या जागावाटपात हा प्रभाग उबाठाच्या वाट्याला आला. तेथून सकीना अयुब शेख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नितीन देशमुख नाराज होता. आता त्याने थेट राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधान भवनातील राड्यानंतर नितीन देशमुख याला शरद पवार पक्षाचे प्रवक्ते पद देण्यात आले होते. मात्र, नाराजीनाट्यानंतर त्याने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या संपूर्ण प्रक्रियेत माझ्यावर अन्याय झाल्याची तीव्र भावना आहे”, अशी प्रतिक्रिया त्याने भाजप प्रवेशानंतर दिली.






