Sunday, January 4, 2026

संभाजीनगरात बाईक व्यवहाराचा वाद जीवावर बेतला; ७ जणांच्या टोळीकडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचं सिनेस्टाईल अपहरण

संभाजीनगरात बाईक व्यवहाराचा वाद जीवावर बेतला; ७ जणांच्या टोळीकडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचं सिनेस्टाईल अपहरण

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री सिनेस्टाईल अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे. स्पोर्ट्स बाईकच्या खरेदी-विक्री व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट थेट अपहरणात झाला. बजरंग चौक परिसरात ७ जणांच्या टोळीने पाठलाग करून १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सिडको पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपासून स्पोर्ट्स बाईकच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थी बजरंग चौक परिसरात असताना दोन कारमधून आलेल्या आरोपींनी त्याला अडवले. काही कळायच्या आतच त्याला उचलून कारमध्ये टाकण्यात आले आणि आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. कंट्रोल रूमच्या मदतीने शहरभर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या कारचा माग घेत वाळूज परिसरापर्यंत थरारक पाठलाग केला. अखेर दोन तासांच्या आत पोलिसांनी कार अडवून विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी विवेक गणेश सोनवणे, पांडुरंग माधवराव सोनवणे आणि रोहन सुनील ढवळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले इतर चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Comments
Add Comment